कृष्णाच्या निवडणुकीत इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:07 AM2021-04-17T11:07:14+5:302021-04-17T11:09:41+5:30
KrushanSugerFactory Karad Satara : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत सभासदांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत पतंगराव कदम यांचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पूर्णपणे इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. साम-दाम-दंड-भेद सर्वप्रकारे या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत सभासदांना हवे असणारे लोक सत्तेमध्ये येतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना हा दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या विचारांतून उभा राहिला आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या प्रेमाखातर आणि या दोन्ही कुटुंबाशी असणारे संबंध पाहता डॉ. पतंगराव कदम हे त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या कार्यक्रमाला कराडमध्ये आले होते, अशी आठवण सांगून मंत्री कदम म्हणाले, कृष्णा कारखाना निवडणुकीत पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी यंत्रणा सक्षमपणे राबविणार आहे. हा कारखाना इंद्रजित मोहिते यांच्या ताब्यात देण्यासाठी जे काय लागेल, ते करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.
इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे मनोमिलनबाबत बोलताना ते म्हणाले, मनोमिलन होण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. एकतर्फी किंवा लादून एकत्र येण्यात कसलाही अर्थ राहणार नाही. कारखान्यातील सभासदांच्या हितासाठी कराड आणि वाळवा तालुक्यातील सर्व नेत्यांना मी व्यक्तिशः भेटलो आहे आणि भेटणार आहे. निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी कशीही होओ, मी इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठामपणे असणार आहे. कारखान्यात चांगल्या विचारांचे लोक सत्तेत यावेत, यासाठी माझा प्रयत्न राहील.
चौकट
कोरोनाच्या कालावधीत राज्यातील सर्व पत्रकार स्वतःचा जीव मुठीत धरून काम करीत आहेत. त्या सर्व पत्रकारांना वयाची अट न घालता कोविड प्रतिबंधक लस देण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालणार आहे. पत्रकारांचा समावेश फ्रन्टलाइन वारियर म्हणून करावा, असा माझा आग्रह असणार आहे, असे मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.
चौकट
दरम्यान, मंत्री विश्वजित कदम व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. सदरची चर्चा ही कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भात झाली, पण त्याचा तपशील समजू शकला नाही.