महसूल विभागाचा जखिणवाडीत कुंभमेळा
By admin | Published: September 30, 2015 10:18 PM2015-09-30T22:18:47+5:302015-10-01T00:30:27+5:30
‘विस्तारित समाधान मेळावा २०१५’ : शासनाच्या ११ स्टॉल्सद्वारे ६७ सेवा आॅन दि स्पॉट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मलकापूर : महाराजस्व अभियानांतर्गत शासनाचा ‘विस्तारित समाधान मेळावा २०१५’ चे जखिणवाडीत आयोजन करण्यात आले होते. ११ स्टॉल्सच्या माध्यमातून तब्बल ६७ सेवांची पूर्तता आॅन दि स्पॉट देण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जणू जखिणवाडीत कुंभमेळाच भरला होता.
जखिणवाडीची महसूल विभागाच्या वतीने विस्तारित समाधान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली. त्यानुसार बुधवारी जखिणवाडीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जखिणवाडी, आटके, नांदलापूर, कोयना वसाहत परिसरातील लोकांना वेगवेगळे जातीचे, जन्माचे, मृत्यूचे दाखले देण्यात आले. रेशनिंग कार्ड, आमआदमी विमा वाटप, राष्ट्रीय कुटुंब योजना धनादेश, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक खाते अशा विविध प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले. पंचाचत समिती कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस विभाग, पशुवैद्यकीय विभाग वनविभाग आदींनी आपापल्या विभागाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी, अविनाश फडतरे, नायब तहसीलदार मिनल भोसले, उपअभियंता व्ही. व्ही. साखरे, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल, सरपंच नरेंद्र नांगर-पाटील, पंचायत समिती सदस्या पुष्पा पाटील, मंडलाधिकारी नागेश निकम, उपसरपंच महेश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष रामदादा पाटील, पांडुरंग पाटील, तानाजी कणसे, ग्रामविकास अधिकारी एन. डी. लोहार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खाद्य पदार्थांची मेजवानी
महिला व बालकल्याण विभागाने विविध खाद्यपदार्थ बनविल्याचा स्टॉल लावला होता. जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी या स्टॉल्सना भेटी दिल्या. खाद्य पदार्थांची चव चाखण्याचा मोह अधिकाऱ्यांना आवरता आला नाही.
एक दिवस मजुरासाठी
शासनाच्या वतीने एक दिवस मजुरासोबत उपक्रम राबविण्यात येतो, तो उपक्रम आज जखिणवाडीत राबविण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी जखिणवाडी शिवारात २०० मजुरांसोबत पूर्ण दिवस घालविला.