गावगुंडाकडून कुमठे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास मारहाण, बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:26 PM2022-03-15T16:26:32+5:302022-03-15T16:27:17+5:30
तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला.
नागठाणे : नागठाणे भागातील कुमठे (ता. सातारा) येथील आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला गावगुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संबंधितावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज प्रकाश वाघमारे (वय ३०, रा. कुमठे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमठे आरोग्य केंद्रामध्ये नागठाणे भागातील ३२ गावे आणि जवळपास ४ उपकेंद्र आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजता डोकेदुखीचे कारण सांगून औषध घेण्यासाठी मनोज वाघमारे दारू पिऊन कुमठे आरोग्य केंद्रात आला. तेथील शिपाई धनंजय नवले यांच्याकडे डोकेदुखीसाठी गोळी मागितली.
त्यांनी त्यास डोकेदुखीसाठी एक गोळी दिली असता, तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला. दरवेळी त्याच्याकडून असाच प्रकार होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे रात्री - अपरात्री कुमठे आरोग्य केंद्रात येण्यामुळे आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोज वाघमारे याच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव अधिक तपास करीत आहेत.