कुणालचे शेवटचे सेलिब्रेशन ठरले जीवघेणे, तपासात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:27 PM2020-02-25T15:27:13+5:302020-02-25T15:29:36+5:30
सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याला पोहता येत नसतानाही त्याने तलावात उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुणाल कृष्णा वाणी (वय १७, रा. नाशिक) याचा रविवारी दुपारी चार वाजता स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला होता. हा प्रकार नेमका कसा घडला, याची पोलिसांनी माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कुणाल हा सहावीपासून सैनिक स्कूलमध्ये शिकत होता.
सहा वर्षे त्याने साताऱ्यात व्यथित केल्यामुळे त्याच्या वर्गातील मित्रपरिवारही मोठा होता. बारावीची परीक्षा संपल्याने मित्रांनी सैनिक स्कूलमधीलच तलावात पोहोण्याचा बेत आखला. रविवारी सुटी असल्यामुळे तलावाला कुलूप लावले होते. असे असतानाही काही मुले भिंतीवरून उड्या मारून तलावात पोहोण्यासाठी उतरली. यावेळी कुणाल वाणीही त्यांच्यासोबत होता.
इतर मुले तलावात उड्या मारून पोहू लागली. त्यावेळी कुणाल काठावर बसून मित्रांसोबत सेल्फी घेत होता. अनेक फोटो त्याने मित्रांसोबत काढले. मात्र, काहीवेळानंतर त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने थेट तलावात उडी मारली. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. काही क्षणातच तो बुडाला. अशा प्रकारे सेलिब्रेशनच्या नादात कुणालला आपला जीव गमवावा लागला. रविवारी रात्री एक वाजता त्याचे आई-वडिल नाशिकहून साताऱ्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास कुणालचा मृतदेह नाशिकला नेण्यात आला.
अन् मुले रांगेत उभी राहिली..
सर्व मुले तलावातून बाहेर आल्यानंतर रांगेत उभी राहिली. आपण कितीजण होतो, हे मुले पाहत असतानाच तलावात कुणाल पालथ्या अवस्थेत मुलांना दिसला. काही क्षणातच मुलांनी तलावात उड्या मारून कुणालला तलावातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार सैनिक स्कूलमधील प्रशासनाला सांगितला.