ढेकळांच्या रानात फिरू लागली बैलं!
By admin | Published: May 24, 2015 09:52 PM2015-05-24T21:52:40+5:302015-05-25T00:39:31+5:30
शेतकरी शिवारात : पेरणीपूर्व मशागतींना वेग; नांगरट, कुळवणीसाठी लगबग
कऱ्हाड : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे आणि कारखान्यांचा गळित हंगामही अंतिम टप्प्यात असल्याने सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतातील पालापाचोळा गोळा करण्यासह नांगरटीच्या कामांनी गती घेतली आहे. काही ठिकाणी हळद लावणीसह प्रारंभ झाला आहे. गत खरीप हंगामाच्या अगदी काढणीपासून अवकाळीला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या भात, भुईमूग, सोयाबीन, मका, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करायला किंवा नुकसान भरपाई द्यायला प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यानंतर रब्बी हंगामाची सुद्धा पेरणीपासून काढणी घेऊन आजअखेर पावसाने काही बळीराजाचा पाठ सोडलेला नाही. रब्बी हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शाळू, गहू, हरभरा आदी पिकांचेही या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगाम काढणीवेळी गारपीट आणि रब्बीच्या काढणीवेळी अवकाळी हात धुवून बळीराजाच्या मागे लागल्याने तो पुरता खचला आहे. आता आगामी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीही सततच्या पावसामुळे करता येईनात, अशी परिस्थिती आहे. सध्या या मशागती बरोबरच रानात शेण खत टाकणे, बांध घालणे आदी कामे जोमात आहेत. डोंगरी परिसरात साधारण मे च्या मध्यापासूनच खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होऊन धूळवाफेवर म्हणजेच कोरड्या मातीत खरिपाच्या पेरण्या होतात.
सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, करडई, मका या पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी मशागतीची नांगरट करणे सोपे झाले आहे. बैलांनाही त्याचा होणारा त्रास यावर्षी वाचला आहे. नांगरट पूर्ण होत आली असून, कुळवाच्या पाळ्या देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
पाटणला भाताची तयारी...
पाटण तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी मान्सूनची हजेरी वेळेवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी भातासाठी वाफे तयार करण्यात व्यस्त आहेत. २५ मे पर्यंत काही शेतकरी पाणी पाजून भाताची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत.
सोयाबीन, भुईमुगावर भर
कऱ्हाड तालुक्यात उसाचे पीक बारमाही घेतले जाते. तसेच खरिपाच्या सुरुवातीला आडसाली उसाची लागणही तालुक्यात होते. उसाबरोबरच सोयाबीन, भात, घेवडा, उडीद, मूग, चवळी, भुईमूग, हायब्रीड आदी पिकांचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जाते. बहुतांश शेतकरी खरिपात भुईमूग व सोयाबीनचे उत्पादन हमखास घेतात.
चार महिन्यांचा असतो हंगाम
पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या पिकांना खरीप पिके म्हणतात. हा खरीप हंगाम जून ते सप्टेंबर दरम्यान असतो. प्रमुख खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, भूईमूग, मटकी, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांचा समावेश होतो.