कुपवाडमध्ये ‘त्या’ भूखंडावर लागला फलक
By admin | Published: June 14, 2015 12:02 AM2015-06-14T00:02:54+5:302015-06-14T00:02:54+5:30
महापालिकेला आली जाग : दोन खोल्या, पाण्याची टाकी सील
सांगली : कुपवाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले होते. या भूखंडाची कब्जेपट्टी मिळून त्यावर नाव नोंद झाले नव्हते. याप्रश्नी महापालिकेला अखेर जाग आली. मंगळवारी सहायक आयुक्त सी. बी. चौधरी यांनी या भूखंडावर महापालिकेचा फलक लावून जागा ताब्यात घेतली.
काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांनी सोमवारी या भूखंडाबाबत आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. कुपवाडमधील कर्मवीर गृहनिर्माण संस्थेने २००३ मध्ये महापालिकेला २० हजार स्क्वेअर फूट जागेची कब्जेपट्टी दिली आहे. पण गेल्या बारा वर्षात महापालिकेने या भूखंडाच्या सात-बारा उताऱ्यावर नाव नोंद केलेले नाही. महापालिकेचा भूखंडाचा ताबा नसल्याने त्या जागेवर विकसकाने अतिक्रमण केले आहे. पाण्याची टाकी, व्यासपीठ उभारले आहे. तरी पालिकेने तातडीने या भूखंडावर फलक लावावा, अशी मागणी माने यांनी केली.
मंगळवारी कुपवाडचे सहायक आयुक्त सी. बी. चौधरी, सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन या भूखंडावर पालिकेचा फलक लावला. भूखंडावरील दोन खोल्या, पाण्याची टाकी सील करण्यात आली. (प्रतिनिधी)