कुरघोडी अधिकाऱ्यांची; फरफट होतेय ग्रामस्थांची

By admin | Published: February 2, 2015 09:31 PM2015-02-02T21:31:01+5:302015-02-03T00:00:43+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Kurghadi officers; The villagers are getting screwed | कुरघोडी अधिकाऱ्यांची; फरफट होतेय ग्रामस्थांची

कुरघोडी अधिकाऱ्यांची; फरफट होतेय ग्रामस्थांची

Next

पिंपोडे बुद्रुक : महिन्यापेक्षा अधिक काळ पंचायत समिती अन् तहसीलदार यांच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात अधिकारी चालढकल करत आहेत. प्रस्तावाच्या नावाखाली ऐकमेकांकडे अंगुलीनिर्देश करूनही कुरघोडी करण्यातच तहसीलदार अन् गटविकास अधिकारी धन्यता मानत आहेत. पण, तहानलेल्या ग्रामस्थांना पाणी कोण देणार? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. भावेनगर, ता. कोरेगाव व डोंगरकडेने वसलेले उत्तर कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील एक छोटेसे गाव, सध्या गावात फक्त २०० ते ३०० च्या आसपास, ग्रामस्थ अन् लहान मुले आहेत. तशी गावची लोकसंख्या हजाराच्या आसपास आहे. मात्र, मेंढपाळ हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे जवळपास सर्वच घरातील तरुण-महिला पुरुष साधारणपणे दसरा-दिवाळीनंतर व्यवसायानिमित्त स्थलांतरित होत असतात. त्यामुळे आता फक्त वयोवृद्ध महिला-पुरुष अन् शाळकरी मुले गावात वास्तव्य करीत आहेत. नोव्हेंबर २०१४ पासून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. गावचे सरपंच संतोष सूळ यांनी गेल्या एक महिन्यांपासून पंचायत समिती कोरेगाव अन् तहसीलदार यांच्याकडे पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती रूपाली जाधव यांनी केलेल्या टंचाईचा प्रस्ताव दाखल करण्याच्या आवाहनानुसार सरपंचांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, पंचायत समिती अन् तहसीलदार या दोन्ही कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने येत आहे.
काही वर्षांत पर्जन्यमान अतिशय कमी झालेले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. चालू वर्षीच्या खरीप अन् रब्बी पिकांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती समोर असताना अधिकाऱ्यांचे हे बेजबाबदार वागणे कितपत योग्य आहे, त्यांना आमची अडचण समजत नाही की, अधिकारी मुद्दाम आमची कुचंबणा करीत आहेत, अशी भावना भावेनगर ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)


भावेनगर ग्रामस्थांच्या अडचणींबाबत तहसीलदारांना तोंडी आदेश दिले आहेत. तरीही दोन दिवसांत प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बोलून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
-दीपक चव्हाण, आमदार
===
माझ्याकडे टंचाईग्रस्त गावांची प्रस्ताव यादी आलेली नाही. तरीही भावेनगर येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतजी जाईल. मात्र, काही कार्यालयीन कामकाजाच्या पद्धती पाळाव्या लागतात.
- अर्चना तांबे, तहसीलदार कोरेगाव

म्हणे प्रस्ताव आलाच नाही...
कागदी घोड्याचे कारण पुढे करून तहसीलदार अन् गटविकास अधिकारी ग्रामस्थांची मात्र फरफट करीत आहेत. गटविकास अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून प्रत्यक्ष पाहणी करून तसा अहवाल दिला असल्याचे सांगत आहेत, तर माझ्याकडे टंचाईग्रस्त गाव म्हणून भावेनगरचा प्रस्ताव आलाच नसल्याचे तहसीलदार सांगत आहेत.

Web Title: Kurghadi officers; The villagers are getting screwed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.