विधानसभेच्या कुरुक्षेत्रात राजेंचा ‘दबावगट’ सक्रिय
By admin | Published: October 10, 2014 10:29 PM2014-10-10T22:29:43+5:302014-10-10T23:00:20+5:30
संधीचा सदुपयोग : जिल्ह्याच्या राजकारणात अढळपद मिळविण्याच्या खेळी यशस्वी
राजीव मुळ्ये - सातारा --लोकसभा निवडणुकीनंतरचा काळ शांततेत व्यतीत केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयुधे परजली असून, जिल्ह्याच्या राजकारणात अढळपद प्राप्त करण्याच्या खेळी दाखविल्या आहेत. या सर्व घडामोडी राजेंच्या आक्रमक राजकारणाचीच चिन्हे मानली जात असून, जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषत: निर्णयप्रक्रियेत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून कायम राहील, असा माहीतगारांचा होरा आहे.
पक्षांतर्गत विरोधाची धार निष्प्रभ करण्यासाठी उदयनराजेंनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून यशस्वी डावपेच खेळल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीचा आणि निर्णयप्रक्रियेवर रामराजे नाईक-निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांचा वरचष्मा नेहमी पाहायला मिळाला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडींमध्येही याच दोघांचा शब्द प्रमाण मानला गेला. याउलट ‘उदयनराजे हाच पक्ष’ अशी घोषणा करून श्रेष्ठींनाही वारंवार आव्हान देणारे उदयनराजे पक्षांतर्गत वर्तुळात महत्त्वाचे स्थान पटकावू शकले नाहीत. उलट निर्णयप्रक्रियेत त्यांचा शब्द निष्प्रभ करण्याचेच प्रयत्न झाले. अगदी खासदारकीचे तिकीट मिळवितानाही त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी ठरावही झाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर्गत विरोधकांनी अनेक मार्गांनी त्यांची वाट रोखण्याचे प्रयत्न केले, हा ताजा इतिहास आहे.
निवडणुकीत मात्र उदयनराजेंनी सचिन तेंडुलकरच्या भूमिकेत टीकाकारांना, विरोधकांना कृतीतूनच उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातून चार खासदार निवडून आले. त्यातील दोघांना निसटता विजय मिळाला; पण उदयनराजेंनी मात्र सर्वाधिक मताधिक्य मिळवून अंतर्गत विरोधकांचा आवाज क्षीण केला. त्यानंतर जणू विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असल्याप्रमाणेच ते शांत राहिले आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी त्यांनी भात्यातले पहिले अस्त्र बाहेर काढले. ‘कार्यकर्त्यांना जिल्ह्यात दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली तर वेगळा विचार करेन,’ अशी तंबी देऊन त्यांनी दबावतंत्राची खेळी खेळली आणि उपाध्यक्षपद खेचून आणले.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात विलासकाका उंडाळकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत तिकीट घेण्याचा आग्रह पक्षाकडून झाला. काकांनी तो अमान्य करताच राष्ट्रवादीला पर्याय शोधावा लागला आणि या ठिकाणीही उदयनराजेंनी आपल्या विश्वासातील राजेंद्र यादव यांच्या नावावर सहमती मिळवून पुन्हा यशस्वी खेळी केली. ही सर्व राजेंच्या आक्रमक राजकारणाचीच चिन्हे मानली जात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा आणि निर्णयप्रक्रियेतील ‘व्हॉल्यूम’ वाढविण्याचा प्रवास आता गतिमानच होत राहील, असे माहीतगारांना वाटते.
प्रचारातील सक्रियताही सूचक
पक्षनेतृत्वाला न जुमानणारे, आपल्या मर्जीचे मालक आणि सर्वच पक्षांमध्ये मित्र असणारे उदयनराजे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ‘आघाडीधर्मा’चा उद््घोष करणारे, काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ दिल्याबद्दल उदयनराजेंवर नाराज राहिले. पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नसल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. मकरंद पाटील यांच्या व्यासपीठावर पाच वर्षांनी हजेरी लावल्यानंतर लगेच मदन भोसलेंचीही भेट घेऊन त्यांनी सर्वांना भुवया उंचावायला लावल्या होत्या. यावर्षी मात्र शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून सक्रिय राहून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले असून, यापुढे पक्षात आणि जिल्ह्यात खुंटा बळकट करण्याचे संकेत दिले आहेत.
‘हाडाचे कार्यकर्ते’ उद्या जिंकणार?
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड झाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सभापती निवडींचा मुद्दा उपस्थित करून ‘हाडाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी’ मिळायला पाहिजे, अशी सूचक मांडणी करून जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या शब्दाला मान देण्याशिवाय यापुढे गत्यंतर नाही, असा इशाराच उदयनराजेंनी दिला आहे. सभापती निवडी येत्या गुरुवारी (दि. २) होत असून, त्यावेळी उदयनराजेंचा हाच नूर कायम राहील, असे दिसते. ‘हाडाचे कार्यकर्ते’ जिंकणार का, हे पाहावे लागेल.