Satara: कुसगाव ग्रामस्थांचे वाई पोलिसांविरोधात अर्धनग्न आंदोलन, नेमकं प्रकरण.. जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: July 18, 2024 07:30 PM2024-07-18T19:30:01+5:302024-07-18T19:30:52+5:30
सातारा : कुसगाव, ता. वाई गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरुन वाई पोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. विनाकारण ...
सातारा : कुसगाव, ता. वाई गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरुन वाईपोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप करत कुसगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. तसेच यावेळी वाई पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुसगाव या गावच्या हद्दीतील एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरून वाई पोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. ग्रामस्थांच्या विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे. तसेच वाईचे पोलिस निरीक्षक, पोलिस उप अधीक्षकांसमवेत अनेक बैठकाही झाल्या होत्या. गुन्हा दाखल केल्या संदर्भाने अनेक चर्चा झाल्या. त्यावेळी गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आले.
परंतु २२ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी ठेवल्यानंतर क्रेशर मालकाच्या विरोधात निकाल जाईल या भीतीपोटी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गुन्हा आधीच दाखल आहे असे सांगण्यात आले. सध्या अटक होणार अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधितांना गुन्हा दाखल झाल्यानंतर नोटीस देणे बंधनकारक होते.
याप्रकरणात पोलिस संशयास्पद वृत्तीने दबाव आणत आहेत. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय आणि दाखल गुन्ह्याबाबत चौकशी व्हावी. पोलिसांकडून सुरू असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करीत आहोत. त्यातच ग्रामस्थांचा पोलिसांवर विश्वास नसल्याने क्रेशर प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत परिसरात राज्य राखीव सुरक्षा दलाची सुरक्षा देण्यात यावी. तसेच याबाबत निकाल लागत नाही तोपर्यंत पोलिसांना यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. असा आदेश व्हावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.