कुसूरच्या ‘लोकेशन’ची सिनेसृष्टीला भुरळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:08+5:302021-02-24T04:40:08+5:30
ऊसतोड मजुरांच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्यांवर डोळसपणे प्रकाश टाकत शेतकरी कुटुंबातील विशाल कदम लिखित गुरुदास दिग्दर्शित ‘फड’ या मराठी ...
ऊसतोड मजुरांच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्यांवर डोळसपणे प्रकाश टाकत शेतकरी कुटुंबातील विशाल कदम लिखित गुरुदास दिग्दर्शित ‘फड’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कुसूर परिसरात सध्या सुरू आहे. विठ्ठल काटेकर यांच्याहस्ते या चित्रीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
मराठी सिनेसृष्टीला कुसूर परिसराची चांगलीच भुरळ पडली आहे. आतापर्यंत ‘सातबारा कसा बदलला’, ‘पिकूली’, ‘भिरकीट’, ‘झाला बोभाटा’, ‘झोला’ आदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. तसेच ‘गाव झालं गोळा रं’ या वेब सिरीजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवीन चेहरे आपल्या कलाकारीने लोकांच्या पसंतीस उतरलेत. तर काही कलाकारांना मालिकांमध्ये अदाकारी दाखविण्याची संधी मिळाली.
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी दिसताना वेगळ्या असल्या तरी, प्रत्यक्ष तशा नसतात. प्रत्येकाची नजर वेगळी असते. चांगली व्यक्ती चांगल्या अर्थाने त्या घटनेकडे पाहते. तर वाईट विचार करणारी व्यक्ती वाईट नजरेने त्याकडे पाहते. परिणामी एखाद्या चांगल्या व्यक्तीलाही अशा संशयामुळे नाना यातना सहन कराव्या लागतात. अशा अनेक घटना, तर काही मनोरंजक घटनाही आपल्या आजुबाजूला घडत असतात. अशाच वेगवेगळ्या घटनांचा ऊहापोह करून ऊसतोड मजुरांच्या जीवनात आलेल्या अनुभवाची सत्यता या ‘फड’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. सध्या कुसूर परिसरात त्याचे चित्रीकरण सुरू आहे.
फोटो : २३केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर विभागाची सिनेसृष्टीला भुरळ पडली असून याठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.