शेतमजुरांनाही धास्ती लोकरी माव्याची !
By Admin | Published: September 1, 2015 08:28 PM2015-09-01T20:28:16+5:302015-09-01T20:28:16+5:30
शेतकरी हबतल : शरीरावर विपरीत परिणाम होण्याची भीती; मणदुरे विभागात भांगलणीची कामे रखडली
मणदूरे : पाटण तालुक्याच्या मणदुरे विभागातील शेतकरी अगोदरच संकटात सापडले आहेत. असे असताना या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे. ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले असून माव्याच्या भितीमुळे शेतमजुर कामाला येत नसल्याची परिस्थिती आहे. लोकरी माव्यामुळे ऊसाच्या पानावर काळा थर जमा होतो. तसेच सरीतही काळे थर जमा होत आहेत. त्यामुळे या लोकरी माव्याचा शरीरावर परिणाम होण्याच्या भितीने मजुर भांगलणीच्या कामालाच येईनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नविन संकट उभे राहिले आहे. पाटण तालुक्याच्या मणदूरे विभागात चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे केरा नदीकाठावर गेल्या चार वर्षापासुन बागायती शेती केली जात आहे. ऊसाच्या शेतीबरोबर अन्य भाजीपाल्याचे उत्पादनही या विभागात घेतले जाते. प्रामुख्याने ऊस शेतीवरच येथील शेतकरी भर देतात. गत हंगामामध्ये ऊसतोडी लांबल्यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. साखरेचे दर उतरल्यामुळे ऊसाच्या दराची कोंडी झाली आहे. यातच भर म्हणून रासायनिक खते, औषधे, मजुरी, ऊस फोडणी, करण्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
यावर्षी साखरी, मेंढोशी, बिबी, देवघर, तामकणे, केर परिसरासह मणदूरे शिवारातील ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. अॅपिडोव्होरा नावाची किड उष्ण व दमट हवामान, तुरळक पडणारा पाऊस यामुळे वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. लोकरी मावा ऊसाच्या पानातील हरीतद्रव्य शोषून घेत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण मंदावते. त्यामुळे ऊसाचे पन्नास टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
वन्यप्राण्यांचाही त्रास
विभागात वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असतो. रानडुक्कर व गव्यापासुन शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून राखणदारी करावी लागत आहे.
ऊसदर कमी झाल्यामुळे ऊसशेती परवडत नाही. रानडुकरांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. रासायनिक खते व मजुरीचे दर वाढले आहेत. त्यातच लोकरी माव्याची भर पडल्याने आम्ही हतबल झालो आहोत.
- श्रीपती जाधव, शेतकरी, मेंढोशी
लोकरी मावा किड नियंत्रणात आणण्यासाठी थायमेट व युरीयाचे मिश्रण सरीमध्ये टाकावे. त्यासोबत डायामिथेनेट १० लिटर पाण्यात २५ मिली याप्रमाणे मिसळून त्याची फवारणी करावी. या किडीचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मजुरांनी भिती बाळगू नये.
- एस. एस. चव्हाण, कृषी सहाय्यक, पाटण