शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:14 PM2019-07-01T14:14:04+5:302019-07-01T14:16:56+5:30
धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सातारा : धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे तब्बल ७७ लाख २१ हजार ५०० रुपयांचे तर वनगळमधील १५ शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा महसूल विभागाने केला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पंचनामा केला त्यात मालगावातील शेतकऱ्यांचे एकूण ११ लाख २ हजार ७०० रुपये तर वनगळमधील शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, आम्हाला मदत कधी मिळणार ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. जिल्हा नियोजन समितीची २९ रोजी बैठक होणार आहे.
लोकमत याबाबत वृत्तमालिका प्रसिध्द करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने नुकसानीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कुठल्या विभागाने ही मदत करायची, याबाबत महसूल व पाटबंधारे विभाग यांच्यात एकमत पाहायला मिळत नाही.
एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम दोन्ही विभाग करताना दिसत आहेत. कालवा फुटल्यानंतर नुकसान भरपाई देण्याची तरतूद पाटबंधारे विभागाकडे नाही तर ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने महसूल खातेही निर्णय घेत नाही. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.