खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत!--सातारनामा

By admin | Published: October 22, 2014 10:08 PM2014-10-22T22:08:23+5:302014-10-23T00:06:31+5:30

कऱ्हाडात रंगला विश्वासघाताचा खेळ : सुडाच्या राजकारणात प्रत्येकाचीच पाठ रक्ताळलेली!---

Lack of loyalty in the dignity of Khanjir! - Saturnama | खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत!--सातारनामा

खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत!--सातारनामा

Next

राजकारण म्हणजे ‘फिरवाफिरवीचा शब्द’. राजकारण म्हणजे ‘बुडवाबुडवीचा व्यवहार’. इथं दिला शब्द पाळायचा नसतो अन् घेतला शब्द झेलायचाही नसतो, तरीही ‘विश्वास’ नावाचा शब्द थोडाफार का होईना कुठं तरी टिकवायचा असतो... पण ‘कऱ्हाड’च्या रणांगणात यंदा विश्वासघातानं केला भलताच थयथयाट. प्रत्येकाच्या हातातल्या खंजिरांचा झाला खणखणाट. निष्ठेनं केला कळवळून आकांत... अन् जखमाळलेल्या पाठींना लागली पुढच्या पाच वर्षांची भ्रांत.


‘सलग सातवेळा काँग्रेसची आमदारकी भोगलेल्या विलासकाकांना यंदा पक्षानं दगा दिला,’ असं काका समर्थकांचं ठाम मत. खरंतर, ‘चढता सुरज धीरे-धीरे ढल जायेगा,’ हे अनुभवी काकांना माहीत असायला हवं होतं. ‘परिवर्तन हा काळाचा अटळ सिद्धांत,’ हेही ध्यानात घ्यायला हवं होतं. पक्षानं घात केला म्हणून रक्ताळलेल्या पाठीनिशी त्यांनी बंडखोरीचा खंजीर उपसला. ‘विश्वासघाताचा बदला’ उंडाळे पट्ट्यात उसळत गेला. याचवेळी अजून एक खंजीर ‘भाजप’वाल्यांनी अतुलबाबांच्या हाती दिला. ‘या निवडणुकीत बाजूला थांबा, असं बाबांनी मला स्पष्टपणे सांगितलं असतं तर मी शांत बसलो असतो,’ ही त्यांची खंत केव्हा सुडाची आग बनून पेटत गेली, हे ‘कृष्णा’काठी कुणालाच कळलं नाही.
यानंतर ‘राष्ट्रवादी’नं मस्तपैकी ‘मस्का-चस्का’ लावलेला खंजीर राजेंद्र यादवांच्या पाठीवरून हळूवारपणे फिरविला. माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभारण्याचं धाडस करणाऱ्या ‘राजेंद्रबाबांची हवा’ त्यांच्याच पक्षानं काढून घेतली; पण तेही भलतेच महाउस्ताद निघाले. त्यांनी बारामतीच्या ‘खंजीर’करांना कऱ्हाडचा खराखुरा ‘सोनेरी खंजीर’ दाखवला. पृथ्वीराज बाबांना पाठिंबा देऊन त्यांनी राष्ट्रवादीला अक्षरश: तोंडघशी पाडलं. हे सारे खंजीर कमी पडले की काय म्हणून अखेर बाळासाहेबांनी आपला ‘अस्सल खंजीर’ बाहेर काढला. ‘राष्ट्रवादी’च्या खेळीला ‘टांग’ मारून काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांचं ‘बोट’ धरलं. एकीकडं ‘उत्तर’मध्ये काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका करायची अन् दुसरीकडं ‘दक्षिण’मध्ये काँग्रेसवाल्यांच्याच मांडीला मांडी लावून कौतुकाची भाषणं ठोकायची, अशी दुटप्पी भूमिका आमदार गटानं घेतली. विशेष म्हणजे, काकांबरोबरची ‘राजकीय सोयरीक’ही एका रात्रीत मोडून टाकली.
आता बाळासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्याची जबाबदारी आनंदरावांवर होती. आयुष्यभर पक्षनिष्ठेच्या बाता मारणाऱ्या नानांच्या कार्यकर्त्यांनी ‘उत्तर’मध्ये ‘घड्याळाचाच गजर’ ऐकला. ऐकविला. पृथ्वीराजबाबांच्या जीवावर हालचाल करणारा ‘धैर्यशीलचा हात’ परस्पर दाबला गेला. आपल्याच नेत्यांनी केलेला हा ‘पाठीवरचा घाव’ कदमांना सहन करण्यापलीकडचा होता. आता त्यांच्या भळभळलेल्या ‘जखमांची खपली’ दीडशे कोटींच्या कामांनी भरून निघेल की नाही, माहीत नाही... परंतु एकंदरच, ‘खंजिरांच्या खणखणाटात निष्ठेचा आकांत’ कऱ्हाडच्या आसमंतात घुमला. गद्दारांच्या धुमश्चक्रीत विश्वासघाताची आरोळी प्रत्येकाचाच थरकाप उडवून गेली.
बाळासाहेबांच्या जिलेबीत ‘आनंदा’ची साखर!
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाच आमदारांपैकी सर्वात कमी मताधिक्य बाळासाहेबांना मिळालं, तरीही त्यांची चक्क ‘जिलेबी तुला’ करण्यात आली. कारण ‘बाळासाहेबांच्या जिलेबीत आनंदाची साखर’ होती. यंदाच्या रणांगणात सर्वात धारदार खंजीर बाळासाहेबांच्या हातात होतं. ‘दक्षिणमध्ये विलासकाकांचा प्रचार करा,’ असे वारंवार निरोप पाठवूनही कऱ्हाडातील नेत्यांकडून ‘बारामतीकरांना ठेंगा’च बघायला मिळाला. दोन्ही पवारांचे मोबाईल कॉलही म्हणे घेतले जात नव्हते. शेवटी हा तातडीचा खलिता समक्ष पोहोचविण्यासाठी ‘बारामती’करांचे ‘देशमुखी दूत’ही कऱ्हाडात दाखल झाले होते, तरीही त्यांना पद्धतशीर टाळण्यात आलं.
‘कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीराजबाबांचा पराभव करणारच!’ अशी राणा भीमदेवी थाटात प्रतिज्ञा करणाऱ्या ‘अजितदादांचा शब्द अन् पक्षाची प्रतिष्ठा’ पार धुळीला मिळविण्याचा मान त्यांच्याच आमदार गटानं पटकावला. कऱ्हाड प्रकारणामुळं म्हणे दादांना पुन्हा एकदा ‘आत्मक्लेष’ झाले. आपणच वाटलेले खंजीर आपल्याच पाठीत शिरू शकतात, याचा दाहक अनुभव दादांसाठी अत्यंत धक्कादायक होता.
‘बाळासाहेबांच्या हातात खंजीर’ तसा जनतेला नवा नाही. कऱ्हाड पालिकेत उदयनराजे गटासोबत. पंचायत समितीत विलासकाकांबरोबर. अन् मलकापुरात पृथ्वीराजबाबांसोबत... असा वेगवेगळा ‘राजकीय संसार’ थाटणाऱ्या या नेत्याला यंदा जनतेनंच जमिनीवर आणलंय. गेली पाच वर्षे बेचाळीस हजारांच्या हवेत असलेले आमदार महाशय नेहमी म्हणायचे की, ‘विजयासाठी मला कुणाचीच गरज नाही!’ आता मात्र म्हणे सूतासारखं सरळ झालेत. पुरते जमिनीवर आलेत. त्यांचे जिवलग मित्र आनंदरावांचंही विमान म्हणे आता लँडिंग झालंय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबांनी त्यांना थेट शहराबाहेर पाठवून दिलं. नुसता ‘नेत्याजवळ वशिला’ असून चालत नाही. ‘जनमानसात प्रतिमा’ ही असावी लागते, हेही यानिमित्तानं स्पष्ट झालं की राऽऽव.

सचिन जवळकोटे

Web Title: Lack of loyalty in the dignity of Khanjir! - Saturnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.