‘ऑक्सिजन’ची टंचाई, ‘बेड’साठी मारामार;‘लसी’साठी तारीख पे तारीख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:10+5:302021-04-27T04:40:10+5:30

कराड : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. दररोज दीड ते दोन हजार बाधितांचा आकडा समोर ...

Lack of oxygen, fight for bed, date pay for vaccine! | ‘ऑक्सिजन’ची टंचाई, ‘बेड’साठी मारामार;‘लसी’साठी तारीख पे तारीख!

‘ऑक्सिजन’ची टंचाई, ‘बेड’साठी मारामार;‘लसी’साठी तारीख पे तारीख!

Next

कराड : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. दररोज दीड ते दोन हजार बाधितांचा आकडा समोर येत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळविताना नातेवाइकांची दमछाक होत आहे. ऑक्सिजनची टंचाई, बेडसाठी मारामार अन् लसीकरणासाठी तारीख पे तारीख अशी भयंकर परिस्थिती पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या महामारी संकटाने साऱ्यांनाच हैराण केले आहे. सातारा जिल्ह्यात त्याचा वेग जरा जास्तच दिसतो आहे. तो आवाक्यात आणायला प्रशासन कमी पडतेय हे नक्कीच! कोणाचा कोणाला मेळ दिसत नाही; पण याचे गंभीर परिणाम बाधित रुग्णांना अन् त्यांच्या नातेवाइकांना सहन करावे लागत आहेत .

आज बाधितांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी मारामार सुरू आहे. कोणाचा तरी वशिला लावला तरच बेड मिळत आहे; पण बेड मिळाला की प्रश्न मिटत नाही. ऑक्सिजनची टंचाई असल्याने नातेवाईकच सलाईनवर दिसत आहेत. रेमडेसिविर मिळत नसल्याने नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर घुटमळताना दिसत आहेत. संबंधित हॉस्पिटलच्या औषध विभागांमध्ये जाऊन वरचेवर इंजेक्शन उपलब्ध झाले का, याची चौकशी करताना दिसत आहेत किंवा बाहेर काळ्या बाजारत कुठे इंजेक्शन मिळतेय का याचा शोधही ते घेताना दिसत आहेत. पैशापेक्षा त्यांच्या दृष्टीने आप्त स्वकीयांचे प्राण महत्त्वाचे आहेत. ही बाब त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते .

रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर बेड उपलब्ध नाही, असेच उत्तर नातेवाइकांना ऐकायला मिळत आहे. तेथे काही नातेवाईक काकुळतीला आल्याचे पाहायला मिळते, तर काही नातेवाईक हॉस्पिटल व्यवस्थापनाबरोबर वाद घालताना दिसतात. काही हॉस्पिटलनी तर ऑक्सिजन टंचाई लक्षात घेऊन गंभीर असणारे रुग्ण टाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या नातेवाईक असणाऱ्या रुग्णांवर नेमकी कोठे आणि कसे उपचार करायचे हे नातेवाइकांना कळेना झाले आहे. आज नातेवाईक अस्वस्थ आहेत; पण प्रशासन तेवढे गंभीर दिसत नाही.

चार दिवसांपूर्वी तर कऱ्हाडात ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यावेळी पोर्टेबल ऑक्सिजन मशीन गोळा करून रुग्णांना दिलासा देण्यात आला. आजही अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांचे प्राण पोर्टेबल मशीनच्या भरवशावर आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्याचे गांभीर्य ओळखायला हवे. केवळ पुरेसा ऑक्सिजन आहे असे सांगून खोटा दिलासा देऊन उपयोग नाही, अशा प्रतिक्रिया आता जनतेतून येऊ लागल्या आहेत.

चौकट

रेमडेसिविर कोठून आणायचे..

ज्या रुग्णालयात कोरोनाबाधित उपचार घेत आहे, त्याच रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र संबंधित हॉस्पिटलच्या मागणीच्या दहा टक्केच इंजेक्शन त्यांना उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आलेली इंजेक्शन नेमक्या कोणत्या रुग्णाला द्यायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. नातेवाईक हॉस्पिटल प्रशासनाशी वाद घालत आहेत; पण इंजेक्शन कोठून आणायची, हा प्रश्न हॉस्पिटल प्रशासनाला व नातेवाइकांनाही पडला आहे.

चौकट

नातेवाइकांनीच आणली ऑक्सिजन सिलिंडर..

दोन दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या नातेवाइकाला ऑक्सिजन टंचाई असल्याचे सांगण्यात आले. आपण रुग्ण इतर ठिकाणी हलवावा अशी विनंती करण्यात आली. तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांनी स्वतः दोन ऑक्सिजन सिलिंडर हॉस्पिटलमध्ये आणून दिली; पण त्यासाठी प्रत्येकी एका सिलिंडरला तीन हजार रुपये किंमत आणि पंधरा हजार रुपये डिपॉझिट त्यांनी भरले. असे करणे सगळ्याच रुग्णांच्या नातेवाइकांना शक्य आहे का, हा प्रश्न आहे.

चौकट

नोंदणी करूनही मिळेना लस..

दुसऱ्या बाजूला शासन लसीकरणासाठी लोकांना आवाहन करीत आहे; पण कोरोना लसीचा तुटवडा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. कऱ्हाड शहरातील पाच लसीकरण केंद्रे त्यामुळेच पाच दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन नोंदणी करूनही लस वेळत मिळत नाही. नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीसाठी तारीख पे तारीख मिळत आहे. त्यामुळे लोक वैतागलेले दिसतात.

कोट

लसीकरणासाठी लोकांची गर्दी मोठी आहे; पण त्या प्रमाणात सध्यातरी लस उपलब्ध नाही. जेवढी लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणात संबंधित लोकांना लस देण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची गरज आहे.

डाॅ. दिलीप सोळंकी, कऱ्हाड नगरपालिका लसीकरण केंद्र

फोटो : कऱ्हाड येथे कोरोनाबाधित रुग्णाला बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक त्यांना गाडीतून घेऊन फिरत आहेत.

Web Title: Lack of oxygen, fight for bed, date pay for vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.