लाडाची लेक सीमेवर लढणार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:20+5:302021-08-24T04:43:20+5:30
सातारा : भारतीय सशस्त्र दलातील मोठी पदे, पर्मनंट कमिशनसाठी महिला अधिकाऱ्यांनी उभ्या केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. सर्वोच्च ...
सातारा : भारतीय सशस्त्र दलातील मोठी पदे, पर्मनंट कमिशनसाठी महिला अधिकाऱ्यांनी उभ्या केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुला-मुलींमधील भेद मिटवून मुलींनाही एनडीएची परीक्षा देता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे समृद्ध सैनिकी परंपरा असणाऱ्या साताऱ्यातील लेकी सीमेवर लढण्याची तयारी करायला सज्ज झाल्या आहेत.
प्रारंभी महिलांंना १९९२ पासून लष्करात संधी देण्यात आली. केवळ पाच वर्षे त्यांना लष्करात संधी होती. त्यानंतर यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली; मात्र लष्करात करिअर करू पाहणाऱ्या महिलांना काही वर्षांत निवृत्त व्हावे लागत होते. यामुळे या निर्णयाविरोधात लष्करी सेवेत शॉर्ट सर्व्हिस पूर्ण केलेल्या महिलांना कायमस्वरूपी पदावर पदोन्नती मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून काही महिला अधिकाऱ्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. या लढ्याला यश आल्याने मुलींनाही आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत संधी मिळण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा करून दिला आहे.
जागतिक पातळीवर अनेक देशाच्या लष्कर सेवेत महिलांचा सहभाग आहे. भारतात ओटीए, नौदल अकादमी, हवाई दल अकादमीत मुलींना सशस्त्र दलात संधी दिली जाते; मात्र तिन्ही दलांसाठी लागणारे अधिकारी तयार करणाऱ्या एनडीएमध्ये मुलींना प्रवेश नव्हता. क्षमता असूनही पदवी होईपर्यंत त्यांना लष्कर सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. न्यायालयाच्या या निकालाने मुलींची ही प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे.
चौकट :
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत मुलांप्रमाणेच एनडीएची परीक्षा मुलींना देता येईल, असे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मुलींना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसण्याची मुभा दिली जाणार आहे. कोरोनामुळे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मुलींनी ही परीक्षा दिल्यानंतर एसएसबी मुलाखत आणि शारीरिक चाचणीतही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जूनमध्ये त्यांना एनडीएत प्रवेश मिळेल.
लष्करात प्रवेशासाठी...!
बारावीनंतर एनडीए आणि पदवी स्तरावर आयएमएचे प्रवेश होतात. आयएमए प्रवेशाला थेट कमिशन, तर ओटीएमध्ये नॉन टेक्निकलसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत प्रवेश दिला जातो. अभियांत्रिकी पूर्ण केलेल्यांना सैन्य दलातील अभियंते, सिग्नल क्षेत्रात संधी असते. मुलींसाठी प्रवेशाची प्रक्रिया वेगळी असून, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा होतात. निवडीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते.
लेकींनी मानले न्यायालयाचे आभार!
मुलींसाठी एनडीए प्रवेशाची संधी दिल्याबद्दल न्याय व्यवस्थेचे शतश: आभार. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संरक्षण क्षेत्रातही मुली आता नेतृत्व करू शकतील. याही क्षेत्रात मुली देशाची मान नक्की उंचावतील. त्यावेळी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होईल.
- निकिता महामुलकर, महामुलकरवाडी.
प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत असताना महिलांना देशसेवेची संधी मिळणं अभिमानाची गोष्ट आहे. महिला इथेही देशाची मान उंचावून देशसेवा करतील. देशाचे रक्षण आणि देशभक्ती दाखविण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- ऋतुजा बर्गे,
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एनडीएची दारे मुलींसाठी खुली झाली आहेत. संरक्षण दलात जाण्यासाठी मुलींना पदवीपर्यंत वाट पहावी लागणार नाही. मुली १६ व्या वर्षी या निर्णयामुळे लष्करात दाखल होतील. या निर्णयामुळे मुला-मुलींमध्ये होणारा भेद कमी होणार आहे.
- आरती दुदुस्कर
शहरात एनसीसीच्या ... मुली...!