शेतकऱ्यांमध्ये हसू आणि आसू
By admin | Published: November 19, 2014 08:57 PM2014-11-19T20:57:21+5:302014-11-19T23:17:15+5:30
अवकाळी पाऊस : ज्वारी, गहू पिकांना मिळाले जीवदान; इतर पिकांचे नुकसान
किडगाव : किडगाव, ता. सातारा परिसरातील नेले, धावडशी, पिंपळवाडी, वर्ये, रामनगर, पानमळेवाडी या गावांमध्ये सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले तर याच वरुणराजाने काही शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आसू आणले आहे.
या परिसरात भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. काही शेतकऱ्यांनी भातपिके काढून शेतात पसर पडली होती, तर काही शेतकऱ्यांची पीक काढणी अद्यापही बाकी आहे. ही पिके चक्क पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिसरात उसतोडही सुरू झाली असून, पावसामुळे ऊसतोडणीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवस तोडणी कामगारांना रात्र जागून काढून या पावसाचा सामना करावा लागला. तोडलेले ऊस रस्त्यावर आणून भरताना शेतकऱ्यांबरोबर ऊस कामगारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
ज्वारी उत्पादन वाढणार
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी ज्वारीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. धावडशी, पिंपळवाडी, आकले, चिंचणी, कण्हेर येथील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. हा पाऊस ज्वारी, गहू या पिकांना लाभदायक आहे. यामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.