साताऱ्यात लाडका भाऊ; काॅंग्रेस पदाधिकाऱ्याच्या खात्यावर चुकून पाच हप्ते जमा
By नितीन काळेल | Published: October 9, 2024 11:20 PM2024-10-09T23:20:12+5:302024-10-09T23:20:22+5:30
ही घटना देसाई यांच्यासाठीही आश्चर्यकारक ठरली आहे.
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत अनेक गंमतीजंमती घडत असून सातारा जिल्ह्यात तर काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या बंद असणाऱ्या बॅंक खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. ही घटना देसाई यांच्यासाठीही आश्चर्यकारक ठरली आहे.
राज्य अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना जाहीर केली. या योजनेबाबत पहिल्यापासून अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी अर्ज केला नसतानाही पुरुषांच्या बॅंक खात्यावर योजनेचे पैसे जमा झाल्याचे दिसून आले आहे. असाच प्रकार सातारा जिल्ह्यातही घडला आहे. राष्ट्रीय काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या जुन्या बॅंक खात्यावर हे पैसे जमा झालेत.
नरेश देसाई यांचे १० वर्षांपूर्वी एका बॅंकेत खाते होते. ते बंद आहे. याशिवाय त्यांना बॅंक खात्याचा नंबरही माहीत नाही. तरीही मोबाइलवर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत त्यांना दीड हजार रुपयांप्रमाणे पाच हप्ते जमा झालेले आहेत. १७ आॅगस्टला ३ हजार, १ आॅक्टोबर दीड हजार आणि ९ आॅक्टोबर रोजी दोन हप्त्याचे ३ हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. याबाबत नरेश देसाई यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, शासनाचे पैसे आहेत. माझ्या जुन्या आणि बंद बॅंक अकाऊंटवर पैसे जमा होत असल्याचा मेसेज येत आहे. आतापर्यंत पाच हप्ते जमा झाल्याबाबत मोबाइलवर मेसेज आलेला आहे.