मलवडीच्या शेतकऱ्याची किमया, एकरातील वांग्यातून मिळवले तीन लाख !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:55 PM2022-01-20T12:55:51+5:302022-01-20T12:56:17+5:30
दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकऱ्याने. अवघ्या एक एकर क्षेत्रात वांगी पिकातून ३ लाख तर आंतरपीक मिरचितून ५० हजार मिळवले आहेत.
सातारा : शेती फायदेशीर तसेच तोट्याचीही. बाजारपेठेचा अभ्यास करून केली तर तोटा होतच नाही. त्यातच निसर्गाची साथ मिळाल्यास शेतकरी मालामाल होतो. अशी किमया केली आहे, दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकऱ्याने. अवघ्या एक एकर क्षेत्रात वांगी पिकातून ३ लाख तर आंतरपीक मिरचितून ५० हजार मिळवले आहेत.
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टीला तोंड द्यावे लागते. तसेच बाजारातही दर न मिळाल्यास केलेला खर्चही निघत नाही. तरीही संकटाशी दोन हात केले तर यश मिळते. त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक असतो. हेच ओळखून माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकरी लहू रखमाजी मिसाळ यांनी वांगी पिकाबरोबर मिरचीचे आंतर पीक घेऊन कमी खर्चात जादा उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला.
लहू मिसाळ यांनी एक एकरात मुख्य म्हणून वांंग्याचे तर अंतर्गत मिरची घेतली आहे. त्यांनी चार फुटी सरीत वांग्याच्या चार हजार रोपांची लागण केली. त्याच पिकात सुमारे साडेतीन हजार मिरची रोपांची लागण केली. पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला. आतापर्यंत मिसाळ यांच्या वांगी पिकांचे चार तोडे झाले आहेत.
आटपाडी, म्हसवड बाजारात झालेल्या लिलावात वांगी तब्बल ११० रुपये किलो दराने खरेदी झाली. तर १५ किलोच्या कॅरेटला तब्बल १६५० रुपयांची बोली लागली. आतापर्यंत त्यांना वांगी पिकातून तीन लाख मिळाले आहेत. तसेच मिरचीतून ५० हजार कमविले आहेत. अजून एक ते दोन महिने तोडे सुरू राहणार आहेत. त्यामुळे कमीत कमी दर धरलातरी खर्च वजा जाता तीन ते साडेतीन लाख रुपये मिळू शकतात.
वांग्यात मिरचीचे अंतर्गत पिक घेतले त्यातून चांगले उत्पादन मिळाले. आतापर्यंत एक एकर वांग्यातून तीन लाख रुपये मिळाले आहेत. तसेच मिरचीतूनही ५० हजार प्राप्त झाले आहेत. - लहू मिसाळ, शेतकरी