हिल मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ ललिताच्या हस्ते !
By admin | Published: September 7, 2016 11:42 PM2016-09-07T23:42:52+5:302016-09-07T23:53:53+5:30
संयोजकांची माहिती : इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मनीसह देशभरातून सात हजार स्पर्धक
सातारा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘सातारा हिल मॅरेथॉन’ स्पर्धेत इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मन अशा अनेक देशभरातून १०० हून अधिक स्पर्धक धावणार आहेत. दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता रिओ आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते ‘फ्लॅग आॅफ’ करून स्पर्धेचा शुभारंभ पोलिस परेड मैदानापासून होणार आहे, अशी माहिती मॅरेथॉन असोसिएशन संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, स्पर्धकांची सत्वपरीक्षा ठरणाऱ्या यवतेश्वर सारख्या खडतर घाटातून हिल मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावण्याचे रेकॉर्ड ‘गिनीज वर्ल्ड’मध्ये सातारा हिल मॅरेथॉनने नोंदविले होते.
यावर्षी ते रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न ‘सातारा हिल मॅरेथॉन’ करणार असल्याचेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
पीएनबी मेटलाईफ ‘सातारा हिल मॅरेथॉन’चे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत देश-विदेशातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदविला आहे.
गतवर्षी सर्व गटांतून ६५०० स्पर्धक धावले होते. त्यापैकी २६१८ धावपटू हे २१ किलोमीटरसाठी धावल्यामुळे या स्पर्धेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.
सातारा हिल मॅरेथॉनने यावर्षी फक्त २१ किलोमीटरचीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी इथोपिया,
केनिया, फिनलँड, जर्मनीसह देशभरातून ७ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. गतवर्षी सातारा जिल्ह्यातील ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. यावर्षी मात्र, हा
प्रतिसाद वाढला आहे. २१ किलोमीटरसाठी १६०० स्पर्धक धावणार आहेत.
यामध्ये महिला स्पर्धकांचीही मोठी वाढ झाली आहे. सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलिस परेड मैदानापासून सुरू होतो. (प्रतिनिधी)
‘बेटी कोई बोज नही’ चा दिला जाणार संदेश !
देशातील मुलींची घटती संख्या हे देशापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासन पातळीवर जनजागृती सुरू आहे. त्यामध्ये मॅरेथॉन असोसिएशन साताराही कुठे मागे नाही हे पदाधिकारी दाखवून देणार आहेत. स्त्री भू्रणहत्या रोखण्यासाठी ‘सातारा हिल मॅरेथॉन’मध्ये यावर्षी एक वेगळे वैशिष्ट्य पाहावयास मिळणार आहे. ३००० स्पर्धक सहकुटुंब लहान मुलींना खांद्यावर घेऊन धमाल फन रनमध्ये साडेतीन किलोमिटर अंतर धावून देशभर ‘बेटी कोई बोज नाही’ हा संदेश देणार आहेत.