वाखरीचा तलाव ठरतोय कर्दनकाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:28+5:302021-05-28T04:28:28+5:30
फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा ...
फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे, तो तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी तलाव फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावे, अशी आर्त साद वाखरीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला घातली आहे.
कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात १९८० मध्ये जवळपास अर्धा टीएमसीला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली. हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे. या तलावावरील सांडव्यामध्ये भगदाड पडले असून, या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली आहेत. या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर संपूर्ण वाहून जाईलच, याबरोबरच जवळ असलेल्या तरटे वस्ती, वाठार निंबाळकर (जुने गाव) बाधित होऊ शकते व यामध्ये किती मृत्यू, किती जनावरे व इतर हानी होऊ शकेल, हे कल्पनेच्या पलीकडे असून, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत वाखरी व येथील तुकाराम शिंदे यांनी याबाबत सर्व स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना या तलावामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, याची माहिती दिली आहे. मात्र यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा तुमचा तलाव अद्याप कोणाकडेही वर्ग केलेला नाही. मात्र तो लवकरच ‘एनआरबीसी’कडे वर्ग करून त्याचे काम केले जाईल, असे सांगितले आहे. पण पुढे जाऊन याबाबत चौकशी केली असता, ते वर्ग झाले नाही, उलट वरिष्ठ अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी केला आहे. हा तलाव कोणत्या विभागाखाली येतो, हे कोणालाच माहिती नसल्याने प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे. वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव. या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व यामधील पाण्यावर अवलंबून आहे. गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासचे ओढे, नाल्यातून ओसंडून वाहत असतात. यामुळे शेतीला पाणी मिळत आहे. पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही. कधीही हा तलाव फुटू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते व कधीही भरून न येणारे गावचे नुकसान होऊ शकते. या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे. या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते. यामुळे गावाला धोम-बलकवडीकडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही, हे आमचे गावचे वैभव आहे. मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे सरपंच शुभांगी शिंदे यांनी सांगितले.
चौकट...
नेमका कुठे पाठपुरावा करायचा...
वाखरीच्या तलावाला आज ३० वर्षे पूर्ण झाली तरी याला मालक (विभाग) कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोणाच्या विभागात हा तलाव येतोय, हे सांगणे ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने नेमका पाठपुरावा कोणाकडे करायचा. या विचित्र मनस्थितीत दुर्घटना घडू नये, यासाठी हा तलाव दुरुस्ती करण्याचे ग्रामपंचायत निवेदन सर्व मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे
(चौकट)
कोरोनापेक्षाही पावसाची भीती जास्त...
पावसाळा तोंडावर असल्याने आमचे गाव वाचवा, आमच्या गावाला कोरोनापेक्षा मोठ्या पावसाची भीती वाटत असून, मोठा पाऊस येऊन तलाव जर भरला आणि फुटला तर गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून, तलाव दुरुस्त करून आमचे गाव वाचवा, अशी आर्त विनवणी सरपंच शुभांगी शिंदे यांनी केली आहे.
27वाखरी
वाखरी (ता. फलटण) येथील तलावाला भगदाड पडल्याने त्यामधून वाहते पाणी पाहायला मिळत आहे.