लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन

By दीपक देशमुख | Published: December 24, 2023 05:43 PM2023-12-24T17:43:12+5:302023-12-24T17:43:24+5:30

सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून यात विक्रमी संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली.

Lakhs of Maratha brothers will take out Satara-Mumbai foot march, chain movement will be held in the district | लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन

लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन

सातारा : मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ६० दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण मंगळवार, दि. २६ रोजी स्थगित करण्यात येणार आहे. यानंतर आरक्षणाची पुढील दिशा जानेवारी महिन्यात ठरणार असून मुंबई येथे सर्व मराठा बांधवांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. तसेच सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून यात विक्रमी संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली.

याबाबत उपोषणस्थळी माध्यमांशी बोलताना समन्वयक म्हणाले, मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. तरीही मराठे शांत आहे. परंतु, आता आमचा संयम सुटला आहे. आजपर्यंत गावोगावी तसेच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने झाली. तरीही राज्यकर्त्यांना जाग आली नाही. यापुढील आमरण उपोषण मुंबईत होईल. मग शासनाला पळता भुई थोडी होईल. मराठा समाजाच्या समनव्यकांच्या हातातील आंदोलन जनतेने हातात घेतले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतांच्या राजकारणासाठी मराठ्यांचा वापर होत आहे. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भुमिका घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले.

मराठा आंदोलनात घरची, शेतीची कामे सोडून मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन आता मंगळवार, दि. २६ पासून स्थगित करत करण्यात येत आहे. एका बालिकेच्या हातून सरबत घेवून हे आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा जानेवारीत ठरेल. ज्याप्रमाणे विक्रमी संख्येने साताऱ्यात मोर्चा काढला, त्याचपद्धतीने विक्रमी मोर्चा मुंबईत निघेल. साताऱ्यातून मोठ्या संख्यने मराठा बांधव चालत मुंबईला जाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांनी केली.

Web Title: Lakhs of Maratha brothers will take out Satara-Mumbai foot march, chain movement will be held in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.