यात्रेतील लाखोंचा खर्च जलसंधारणासाठी -- गुड न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:37 AM2018-03-28T00:37:49+5:302018-03-28T00:37:49+5:30
म्हसवड : माण तालुक्यातील दिवड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांना केला जाणारा लाखो रुपयांचा अनाठाई खर्च यावर्षी
सचिन मंगरुळे ।
म्हसवड : माण तालुक्यातील दिवड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांना केला जाणारा लाखो रुपयांचा अनाठाई खर्च यावर्षी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बचत झालेली रक्कम गावच्या जलसंधारण कामांसाठी खर्च केली जाणार आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दुष्काळी म्हणून परिचित असलेल्या माण तालुक्यातील अनेक गावांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे पूर्णत्वास आली आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातूनही अनेक गावे दुष्काळमुक्त होऊन पाणीदार झाली आहेत. या गावांचा आदर्श घेऊन यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये सहभागी होत गावाला दुष्काळ मुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
हे करीत असताना गावाने ग्रामदैवताच्या यात्रेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर लाखो रुपयांची
होणारी उधळपट्टी थांबवून ही रक्कम पाणी फाउंडेशनच्या कामांना वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दिवड हे गाव म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या २ हजार ७६३ आहे. या गावाला उन्हाळ्यात चार महिने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या नेहमीच्या पाणीटंचाईवर व दुष्काळावर मात करण्याचा सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
यात्रा कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्रित येत गावाला दुष्काळमुक्त करण्याचे पाऊल उचलेले असून, हा निर्णय घेण्यासाठी अशोकशेठ सावंत,सरपंच रामचंद्र सावंत, उपसरपंच दादासो सावंत, जगन्नाथ सावंत, सदाशिव सावंत, अंकुश भोसले, गंगाराम सावंत, नामदेव सावंत,हणमंत सावंत, चेअरमन नवनाथ शिंदे, नीलेश सावंत, मच्छिंद्र भोसले, नवनाथ दगडे, राजू सावंत यांनी प्रमुख भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या निर्णयाचे स्वर स्तरातून कौतुक होत आहे.
पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब आडवून वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात करणार आहे. दिवड गावची दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी व गाव पाणीदार करण्यासाठी आता ग्रामस्थ एकवटले आहेत.
- रामचंद्र्र सावंत, सरपंच
आम्ही दरवर्षी यात्राकाळात मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करत होतो. तो खर्च यंदाच्या यात्रेत न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, ही सर्व रक्कम जलसंधारणाच्या कामावर खर्च केली जाणार आहे.
- हणमंत सावंत, यात्रा कमिटी सदस्य