‘लक्ष्मी’च्या पावलांनी इच्छुक मतदारांच्या घरी!

By admin | Published: September 6, 2016 10:01 PM2016-09-06T22:01:34+5:302016-09-06T23:44:42+5:30

कऱ्हाडचा गणेशोत्सव : ‘उदंड’ जाहले आरती संग्रह; घरपोच पूजा साहित्य; गणेशभक्तांचा प्रवासही फुकटात

'Lakshmi' steps to the voters' home! | ‘लक्ष्मी’च्या पावलांनी इच्छुक मतदारांच्या घरी!

‘लक्ष्मी’च्या पावलांनी इच्छुक मतदारांच्या घरी!

Next

प्रमोद सुकरे--कऱ्हाड --पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने इच्छुक उमेदवार मतदारांना भेटण्यासाठी काही ना काही निमित्त शोधतायत. निवडणुकीचा थेट विषय घेऊन गेल्यास मतदारांचे ‘वक्रतुंड’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन झाले. आता गणेशोत्सवही जणू इच्छुकांसाठी आयती संधी घेऊन आलाय. मग काय ‘लक्ष्मी’च्या पावलांनी हे इच्छुक त्यांच्या दारात नव्हे तर थेट घरातच पोहोचले आहेत. ‘मोदक’रूपी प्रसादही प्रत्येक कुटुंबात पोहोचत आहे; पण मत रूपी प्रसाद कोणाला द्यावा, याबाबत हा ‘विघ्नेश्वर’ कऱ्हाडकरांना कशी सुबुद्धी देणार, हे मात्र सांगता येत नाही.
गणेशोत्सवाप्रमाणेच निवडणुकांचे स्वरूपही बदलत आहे. शहरी भागात तर हा बदल प्रकर्षाने जाणवतो. इथल्या चाणाक्ष मतदारांना आपलसं करण्याबाबत इच्छुकांच्यात ‘चिंतामणी’ असला तरी वावगं ठरणार नाही; पण ‘संकट मोचक’ असणाऱ्या गणेशाच्या साक्षीनेच इच्छुकांनी मतदारांना साकडं घालण्याचा प्रयत्न चालविलाय. निवडणुकीतील अनेक विघ्ने हा ‘विघ्नहर्ता’च दूर करील अशी त्यांची आशा आहे.
आता फ्लॅट संस्कृतीत कुठेतरी देवाऱ्हा पाहायला मिळतोय. शुभंकरोती हद्दपार होत चाललीय. आरत्या पाठ असण्याचा विषय तर दूरच! त्यामुळे आरत्यांची संकलन केलेली पुस्तके पुढे बाजारात आली. अलीकडच्या काळात तर गणेशोत्सवात हे आरती संग्रह प्रत्येकवेळी उपलब्ध होऊ लागलेत; पण निवडणुकीच्या तोंडावर घराघरात इच्छुकांनी प्रसिद्ध केलेले एवढे आरती संग्रह येऊन पोहोचले आहेत की, आता या आरती संग्रहांचाच संग्रह करावा की काय, असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू असताना एका नगरसेवकाने कुंभारवाड्यातून घराकडे गणपती मूर्ती घेऊन जाण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करून देण्याचा जणू ‘विक्रम’च केला. त्यामुळे लोकांची सोय झाली खरी; पण रिक्षा खड्ड्यातूनच जात होती बरं! आता त्यांनी आणलेला कोटींचा निधी प्रत्यक्षात वापरात कधी येणार, याचीही प्रतीक्षाच!
काही इच्छुकांनी प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा इरादा केला. मग ही कापडी पिशवी रिकामी कशी द्यायची म्हणून त्यात पूजेचे साहित्य घालण्यात आले अन् आपापल्या प्रभागात घरोघरी हे पोहोच करण्यात आले. इच्छुकांची संख्या अन् आलेले पूजेचे साहित्य पाहता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी हेच इच्छुक उमेदवार पुन्हा दारात आल्यावर त्यांची ‘पूजा’ करेपर्यंत साहित्य पुरेल, अशी चर्चा आहे.
एका इच्छुकाने तर मंगळवारी ‘मन’से प्रभागातील लोकांच्या घरी जाऊन प्रतिष्ठापना केलेल्या ‘मयूरेश्वरा’ला मोदकाचा प्रसाद अर्पण केला. अनेकांनी तर गौरीचा सण साजरा करण्यासाठी भगिनींच्या हातात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे असणारी स्टीकर देऊन आशीर्वाद मागितला; पण त्यांची पावले आताच इकडे का वळली, हा प्रश्न आहे.
निमित्त जरी गणेशोत्सवाचे असले तरी तयारी पालिका निवडणुकीची चाललीय, हे कऱ्हाडकरांनी ओळखलंय. ‘गिरीजात्मक’च्या दर्शनासाठी इच्छुक घराघरापर्यंत पोहोचत असले तरी ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय आपल्यावर कोणी ‘मेहरबान’ होणार नाही, हे देखील इच्छुकांना चांगलेच माहीत आहे बरं !


...पण हे ‘विनायक’ कधी पावणार?
‘सिद्धिविनायक’, ‘वरद विनायक’ असणाऱ्या ‘बल्लाळेश्वरा’ची सोमवारी घरोघरी अन् सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने चौकाचौकांत प्रतिष्ठापना करण्यात आली. कऱ्हाडात जणू ‘महागणपती’ उत्सव परंपरेने सुरू आहे; पण आठ महिन्यांपूर्वी पालिकेचा कारभार हाकण्यासाठी आलेले ‘विनायक’ आम्हाला कधी पावणार, असा प्रश्न विद्यमान नगरसेवकांना पडलाय. नियमावर ‘बोट’ ठेवणाऱ्या या विनायकाच्या मनात काही ‘खोट’ नसली तरी कामे मात्र, रेंगाळली आहेत. ती मार्गी लागावीत हीच प्रार्थना नागरिक ‘एकदंता’कडे करीत आहेत.


गौरी पाठोपाठ आता ‘लक्ष्मी’ही येणार!
गुरुवार, दि. ८ रोजी घरोघरी गौरीचे आगमन होणार आहे. खरं तर त्यावेळी ‘आली गं गौराय आली गं बायी, कशाच्या रूपाने, सोन्या रूप्याच्या पायी, लक्ष्मीच्या पायी’ या गोष्टी कानावर पडणार अन् गौराई हातात घेतलेल्या लहान मुलीचे कुंकवात बुडविलेल्या पायाचे ठसे घरात उमटवणार; पण त्या अगोदरच या गौरीच्या पावलांचे सुबक स्टिकर्स घराघरात पोहोचले असून, लवकरच ‘लक्ष्मी’च्या पावलांनी आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत, असे तरी स्टिकर देणाऱ्यांना सांगायचे नसेल ना?

Web Title: 'Lakshmi' steps to the voters' home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.