मोहीतील सत्काराने ललिता भारावली
By admin | Published: August 26, 2016 11:22 PM2016-08-26T23:22:07+5:302016-08-26T23:29:26+5:30
जंगी स्वागत : ग्रामस्थांची मोठी गर्दी
पळशी : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबरचे माण तालुक्यात आगमन झाले. दहिवडी, गोंदवले, लोधवडे पाठोपाठ मोही या तिच्या मूळगावी ग्रामस्थांनी ललिताचे फटाक्याच्या आतषबाजीत जंगी स्वागत करत मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या सत्काराने ललिता भारावून गेली.
शुक्रवारी सकाळपासूनच मोही ग्रामपंचायतीच्या पटांगणावर विद्यार्थी, क्रीडाप्रेमींनी तसेच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चौकाचौकांत फटाक्यांचे आवाज घुमत होते. स्पर्धेनंतर पहिल्यांदाच ती आपल्या मूळगावी मोही येथे आल्याने घरोघरी रांगोळी काढून ललिताचे स्वागत करण्यात येत होते. ढोल-ताशांच्या गजरात ललिताची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, मुले, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, आबालवृद्धांसह ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अनुराधा देशमुख, डॉ. माधव पोळ, आई निर्मला बाबर, वडील शिवाजी बाबर, ललिताचे काका गणेश बाबर, रमेश शिंदे, विरभद्र कावडे, ज्ञानेश काळे, भारत चव्हाण आदी उपस्थित होते.
मिरवणूक महालक्ष्मी मंदिराजवळ आल्यानंतर ललिताने देवीची पूजा केली. यावेळी मंदिरात आयोजित कार्यक्रमात ललिताला मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाप्रेमींनी, ग्रामस्थांनी, विविध मंडळे, शाळा, पतसंस्थांनी ललिताचा सत्कार केला. (वार्ताहर)
ललिताला मदत...
सत्कारादरम्यान ललिताला वेळे येथील आराम हॉटेल यांच्याकडून पन्नास हजार, पिंजरा कला केंद्राकडून पन्नास हजार, श्रीराम गणेश मंडळाकडून (मोही) पंचवीस हजार, मोहीतील महालक्ष्मी पतसंस्थेकडून पंचवीस हजार तर महालक्ष्मी देवस्थानकडूनही अकरा हजार रुपयांची मदत देण्यात आली.