लालपरीचे स्टिअरिंग सहाजणींच्या हाती - एसटीत क्रांती ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:43 PM2020-03-12T18:43:01+5:302020-03-12T18:45:36+5:30
दीपाली बळे या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत. त्यांना या क्षेत्रात येऊन ग्रामीण जनतेसाठी सेवा करण्याची इच्छा आहे. वाई तालुक्यातील स्वाती मोतलिंग या चालक-वाहकाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील वाई आगारात चालक आहेत. वडील कोणत्याही सणाला घरी नसतात; ते करत असलेल्या कामाचा स्वाती यांना अभिमान आहे.
जगदीश कोष्टी ।
सातारा : ‘कोण म्हणतं एसटी चालवणं महिलाचं काम नाही... आम्ही ते ‘चॅलेंज’ स्वीकारतोय. त्यासाठी आम्ही एसटी महामंडळात भरती झालोय. कोणतीच महिला कसलंही व्यसन करत नाही अन् आमचे लक्ष फक्त कामावर राहणार आहे... त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी एसटीचं स्टिअरिंग हाती घेतलं आहे,’ असा आत्मविश्वास सातारा विभागातील प्रशिक्षणार्थी तरुणींना वाटतो.
सातारा विभागात मुंबई येथून धनश्री खराडे, सुनीता यादव तर सातारा जिल्ह्यातून स्वाती मोतलिंग, दीपाली बळे, स्वाती इतापे या चालक-वाहक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना सध्या तीन महिन्यांचे मानसिक तयारी करणे, त्यानंतर एसटीतील तांत्रिक बाबी अन् त्यानंतर चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चालकपदासाठी बारावी उत्तीर्ण असले तरी चालते; पण भरती झालेल्या सर्वच तरुणी सुशिक्षित आहेत. धनश्री खराडे, सुनीता यादव या दोघी मुंबईच्या आहेत. त्याठिकाणी एसटीत चालकपदासाठी संधी नव्हती म्हणून त्यांनी सातारा विभागात भरती होण्याचा निर्धार केला. कोणतेही काम अवघड नसते, अशी खूणगाठ मनाशी बांधून त्या एसटीत भरती झाल्या.
त्याचप्रमाणे दीपाली बळे या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत. त्यांना या क्षेत्रात येऊन ग्रामीण जनतेसाठी सेवा करण्याची इच्छा आहे. वाई तालुक्यातील स्वाती मोतलिंग या चालक-वाहकाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील वाई आगारात एसटी चालक आहेत. त्यांच्या वडिलांना कसलेही व्यसन नाही. वडील कोणत्याही सणाला घरी नसतात; पण ते करत असलेल्या कामाचा स्वाती यांना अभिमान आहे.
एसटीकडून नियमात शिथिलता
महिलांनी या क्षेत्रात यावे म्हणून एसटीनेही नियमावलीत बदल केले. हलके वाहन चालविण्याचा परवाना असला तरी त्यांना भरती करून घेतले आहे. आता त्यांना तीन महिन्यांचे लेखी प्रशिक्षण, त्यानंतर सहा महिन्यांचे तांत्रिक व इतर कौशल्ये त्यानंतर १०८० किलोमीटरचे चालविणे. त्यानंतर तीन हजार किलोमीटर चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अवजड वाहनाचा परवाना काढून दिले जाणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे, प्रशिक्षक प्रल्हाद मदने यांनी दिली.
संसार, मुलं असतानाही मागे नाहीत..
सातारा विभागात सहाजणी दाखल झाल्या आहेत. त्यातील पाचजणी विवाहित आहेत. त्यातील काहींना मुलंही आहेत. स्वाती इतापे यांना तर सात वर्षांचा मुलगा आहे. तरीही या उमेदवारांनी कोठेही हार मानलेली नाही. आपल्याला हे कसे जमेल, हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही. या सर्वांनाच आई-वडील, कुटुंबीयांची साथ आहे. त्याचप्रमाणे समाजातूनही साथ मिळेल, हाही त्यांना विश्वास आहे.
‘लोकमत’चं पाठबळ...
‘दिल्ली निर्भया प्रकरण घडल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत महिला चालक का नाही,’ असा विषय घेऊन ‘लोकमत’ने जनजागृती केली होती. त्याला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची मोलाची साथ लाभली होती. जिल्ह्णातील इच्छुक तरुणींना मोफत प्रशिक्षण देण्याची सोय केली होती. त्याची फळं दिसायला लागली आहेत. त्यातूनच स्वाती मोतलिंग यांनाही लहान वाहने चालविण्याचे मोफत प्रशिक्षण घेता आले. राज्य परिवहन महामंडळात आजवर चालकपदी महिला काम करत नव्हत्या. एसटी महामंडळाने महिलांसाठी आरक्षण ठेवले अन् महिला रुजू होऊ लागल्या आहेत. ही संख्या भविष्यात निश्चित वाढलेली दिसणार आहे.