लामजचा पाऊस दहा हजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:33 PM2019-09-17T23:33:13+5:302019-09-17T23:33:19+5:30
बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...
बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होता. पावसाने उघडीप घेतली असली तरी साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या लामजमध्ये अजून संततधार सुरू आहे. मागील १०८ दिवसांमध्ये गावात १० हजार २३९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गावातील उत्तेश्वर पद्मावती मंदिराचा ४० फूट उंचीचा कळस जमीनदोस्त झाला
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून बºयाच ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी लामज गावात अजूनही तो जोरदार कोसळतच आहे.
लामज हे गाव सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला कोयना जलाशयाच्या काठावर महाबळेश्वर तालुक्यात आहे. सुमारे ९० घरांच्या उंबऱ्यांचे व साधारण ४०० लोकसंख्येचे दुर्गम खेडेगाव आहे. हे गाव कांदाटी खोºयात असून, या गावात जाण्यासाठी बामणोली येथून लाँचने सुमारे दीड तास वेळ लागतो. जिल्हा परिषदेची लाँच या गावात जाते. दुसरीकडून तापोळा येथून तराफ्यात गाडी घेऊन पलीकडून गाढवलीमार्गे कच्च्या रस्त्याने जाता येते.
लामज या गावात १ जून ते १६ सप्टेंबर या १०८ दिवसांत वरुणराजा १० हजार २३९ मिलिमीटर एवढा बरसला आहे. या गावात दोन वर्षांपूर्वी बसविलेल्या पर्जन्यमापकावर तशी नोंद झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कच्चा रस्ताही वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थांना पाण्यातून लाँचनेच प्रवास करावा लागतो. तसेच पावसाने परिसरातील विजेचे खांब पडल्याने गाव अंधारातच आहे. तर दुसरीकडे उत्तेश्वर येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर तर जून महिन्यापासून बंद आहे.