लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:10 AM2018-05-16T05:10:02+5:302018-05-16T05:10:02+5:30
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर (१०२) यांचे मंगळवारी वाई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
सातारा : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर (१०२) यांचे मंगळवारी वाई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यमुनाबाईंचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ रोजी वाई येथे झाला. त्यांचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे होते. वाईची कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे लोककलेचे माहेरच होते. यमुनाबाई १० वर्षांच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगावी तमाशाच्या फडाबरोबर जाऊ लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.
अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ‘मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या नाटकांमध्येही भूमिका केल्या. ‘महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.
>‘लोकमत’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार
प्रभाकर ओव्हळ यांनी ‘लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर’ या नावाने लिहिलेल्या चरित्राचा मुंबई विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. लावणी क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या वाईकर यांना २०१६ मध्ये ‘लोकमत’ने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
>लोककलेच्या प्रसारासाठी त्यांनी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने आपण एक निस्सिम कलाउपासक गमावला आहे. लावणीच्या प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. नव्या पिढीतील कलावंतांना त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>यमुनाबाई वाईकर थोर लावणी व तमाशा कलाकार होत्या. सर्व नवोदित कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कलासाधना व कलासेवेसाठी समर्पित केले.
-सी.विद्यासागर राव, राज्यपाल
>लावणी गाताना त्यांची अदाकारी विशेष होती. त्यांचा माझा चांगला परिचय होता . त्यांच्या जाण्याने लावणी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
- श्रीनिवास पाटील,
सिक्कीमचे राज्यपाल
>विविध पुरस्कारांनी केला होता सन्मान
मध्य प्रदेश सरकारचा ‘देवी अहिल्या सम्मान’
(१९९९-२०००)
पद्मश्री (२०१२)
संगीत नाट्य अकादमीचा रवींद्रनाथ टागोर रत्न पुरस्कार (२०१२)
संगीत कला केंद्राचा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर २०१२ पुरस्कार’