लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 04:05 PM2018-05-15T16:05:48+5:302018-05-15T16:14:54+5:30

जेष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन झाले आहे. त्या 102 वर्षाच्या होत्या.

Lamentationist YamunaBai Waikar passed away | लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

googlenewsNext

सातारा - ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 102 वर्षाच्या होत्या. वाईच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यमुनाबाईंना कलेतील योगदानामुळे भारत सरकारने 2012मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 

अल्प परिचय - (जन्म 31 डिसेंबर 1915)
यमुनाबाईंचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे होते. त्या राहात असलेली वाईची कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे लोककलेचे माहेरच होते. यमुनाबाई दहा वर्षांच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर जाऊ लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.

लोकनाट्यातून नाटकांकडे - 
अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

पुरस्कार - 
- यमुनाबाईंना मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय देवी अहिल्या सम्मान हा इ.स. 1999-2000 सालचा पुरस्कार मिळाला.(एक लाख रुपये रोख + प्रशस्तीपत्र वगैरे)
- यमुनाबाईंना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार 2012 साली मिळाला.
 - संगीत नाट्य अकादमीचा रवींद्रनाथ टागोर रत्न पुरस्कार (2012) (३ लाख रुपये रोख + वगैरे)
- संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' 2012 सालचा लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दिला गेला.  

यमुनाबाई वाईकर यांचं जीवनचरित्र प्रभाकर ओव्हळ यांनी शब्दबद्ध केलं. 'लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर’ या नावाने लिहिलेल्या चरित्राचा मुंबई विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. लावणी क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना 2016 मध्ये ‘लोकमत’ने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. 

लावणी गाताना त्यांची अदाकारी विशेष होती. त्यांचा माझा चांगला परिचय होता . त्यांच्या जाण्याने लावणी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Lamentationist YamunaBai Waikar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.