मसूर येथे सशस्त्र दरोडा टाकून ५ लाखाचा ऐवज लंपास, डॉक्टर दांपत्यास केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 02:00 PM2022-03-03T14:00:10+5:302022-03-03T14:00:34+5:30
घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. तर, तपासासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली.
मसूर : येथील संतोषीमाता नगर येथे राहणारे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी डॉक्टर दांपत्यास बेदम मारहाण करत वारे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात डॉ. संपत इराप्पा वारे व अनिता संपत वारे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेने मसूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी डॉ. वारे व पत्नी अनिता वारे यांना दांडक्याने मारहाण केली व गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर हॉल मध्ये झोपलेल्या पुष्पा जगदाळे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व नऊ हजार रुपये रोकड काढून घेतली. डॉक्टर वारे यांची सून पूजा हिने गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण व कानातील टॉप्स त्यांना काढून दिले. दरोडेखोरांनी डॉ. वारे यांच्या घराबाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून दमदाटी करून दरोडेखोर निघून गेले.
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अजित बोराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करुन तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. चोरीच्या तपासासाठी चार वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली.
घरांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज ठेवला असताना त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. लाखो रुपये खर्चून मोठमोठे बंगले बांधले आहेत. परंतु सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. घराच्या सुरक्षेसाठी काळाच्या गरजेनुसार सीसीटीव्ही सेफ्टी डोअर, लाईट इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. - अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक,उंब्रज