कूळ कायद्याने मिळालेली जमीन परस्पर विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:57+5:302021-01-25T04:39:57+5:30
मुंबई कूळ वहिवाट व जमीन अधिनियमांचा भंग करून चालू बाजारभावाने ५० टक्के होणारे मूल्यांकन न भरल्यामुळे नांदगाव, ता. कऱ्हाड ...
मुंबई कूळ वहिवाट व जमीन अधिनियमांचा भंग करून चालू बाजारभावाने ५० टक्के होणारे मूल्यांकन न भरल्यामुळे नांदगाव, ता. कऱ्हाड येथील रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या जमिनीवर ‘सरकार’ अशी नोंद करण्यात आली आहे. या जमिनीवर ‘सरकार’ची नोंद करण्याचा आदेश २० जानेवारी रोजी पारित करण्यात आला आहे. कूळ कायद्यानुसार कऱ्हाड तालुक्यातील अनेकांना मूळ मालकाची जमीन कुळाला मिळाली आहे. दरम्यान कूळ कायद्याने मिळालेली जमीन अनेकांनी इतरांना खरेदी दिली आहे. वास्तविक हा खरेदी व्यवहार करताना मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ८४ (क) नुसार महसूल विभागाकडून परवानगी घेणे गरजेचे असताना अनेकांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. कऱ्हाड महसूल विभागाच्यावतीने अशा प्रकरणांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत एकूण ६५ प्रकरणे महसूल विभागाकडे दाखल झाली आहेत.
नांदगाव, ता. कऱ्हाड येथील रघुनाथ आत्माराम पाटील यांनी कूळ कायद्याने मिळालेल्या चार जमिनींचा खरेदी व्यवहार केला. मात्र, यावेळी त्यांनी महसूल विभागाची परवानगी न घेता व अधिनियमाचा उल्लंघन केल्याबद्दल तसेच खरेदी व्यवहार करताना चालू बाजारभावाने ५० टक्के होणारे मूल्यांकन न भरल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झालेल्या चार जमिनीच्या खरेदी व्यवहारातील जमिनीवर महसूल विभागाने ‘सरकार’ असे नाव नोंदणी केली आहे. चार जमिनीच्या गट नंबर, क्षेत्र, आकारचा विचार करता चालू बाजार भावाने ५० टक्केने होणारे मूल्यांकन एकूण २ लाख ७ हजार १४० एवढे आहे.
कूळ वहिवाट यानुसार मिळालेल्या जमिनीच्या परवानगी न घेता खरेदी झालेल्या व्यवहारांचा शोध महसूल विभाग घेत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या वेळेला या कार्यालयानेही सदर व्यवहार होत असताना शासकीय दस्त नियमानुसार व कायद्याच्या चाकोरीत होतो का नाही? हे पाहणे आवश्यक असताना या कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे.