जमिनीचा वाद, न्यायालयात हजर राहाता येऊ नये म्हणून हायकोर्टाचे समन्स चोरले; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:40 PM2022-06-13T16:40:21+5:302022-06-13T16:40:40+5:30
सातारा: अमेरिकेहून मुलांना भेटून साताऱ्यात आल्यानंतर हायकोर्टाने पाठविलेले समन्स चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित वृद्ध वकिलांनी घरातील ...
सातारा: अमेरिकेहून मुलांना भेटून साताऱ्यात आल्यानंतर हायकोर्टाने पाठविलेले समन्स चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारानंतर संबंधित वृद्ध वकिलांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन अनोळखी व्यक्तींनी ते समन्स चोरून नेल्याचे कैद झाले. हा सारा खटाटोप न्यायालयात हजर राहता येऊ नये म्हणून केला असल्याचे संबंधित वकिलांनी पोलिसांना सांगितले.
साताऱ्यातील रविवार पेठेत राहणारे ॲड. विजयसिंह घोरपडे (वय ७६) हे मूळचे नांदगाव, ता. सातारा येथील रहिवासी आहेत. त्यांची तिन्हीही मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. मुलांना भेटण्यासाठी ते १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेरिकेला गेले होते. दरम्यान, न्यायालयात जमिनीचा त्यांचा दावा सुरू आहे. या दाव्यातील रिट पिटीशन समन्स हायकोर्टाने त्यांना बजावले होते. काही दिवसांपूर्वी ते अमेरिकेहून साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या घराजवळ समन्स अडकवलेले त्यांना दिसले नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये दोघेजण ते समन्स चोरून नेताना स्पष्टपणे दिसून आले.
या प्रकारानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जावरून तपास केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल केला. ॲड. घोरपडे यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून, त्यानंतरच समन्स चोरून नेणाऱ्यांची ओळख पटणार आहे. हा सारा प्रकार ॲड. घोरपडे यांनी न्यायालयात हजर राहू नये, यासाठी केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.