कऱ्हाडच्या समितीत जागेचीच ‘पंचाईत’ !

By admin | Published: September 10, 2015 12:40 AM2015-09-10T00:40:11+5:302015-09-10T00:43:57+5:30

पंचायत समितीची दुरवस्था : इमारतींच्या कोपऱ्यात गठ्ठेच गठ्ठे; सूचनांसह योजनांचे फलकही गायब

The land of the Karhad Committee is 'scarcity'! | कऱ्हाडच्या समितीत जागेचीच ‘पंचाईत’ !

कऱ्हाडच्या समितीत जागेचीच ‘पंचाईत’ !

Next

संतोष गुरव ल्ल कऱ्हाड
शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर, पंचायत समिती तर गाव स्तरावर ग्रामपंचायतीची उभारणी करून त्यातून विविध योजना ग्रामीण भागात राबविल्या गेल्या; मात्र कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सध्या कधी योजना येते अन् निघून जाते, याची माहिती सदस्यांसह शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना तसेच शासनाच्या उपक्रमांची माहिती पुस्तकेही इमारतीच्या कोपऱ्यात ठेवली जात असल्याचे दिसते. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फायलींचे गठ्ठे हे धूळखात पडलेल्या अवस्थेत असल्याने त्याकडे कधी लक्ष दिले जाणार? असा प्रश्न येणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. जागेअभावी बाहेर ठेवल्या जाणाऱ्या गठ्ठ्यंमुळे कऱ्हाड पंचायत समितीत आता जागेचीच ‘पंचाईत’ झालेली दिसून येत आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कशी पुढे नेता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी देखील स्वच्छतेबाबत सर्वांना सूचना केल्या. अशातून जिल्ह्यात एकीकडे स्वच्छतेबाबतीत व योजनांच्या बाबतीत राज्यात डंका पिटणारी कऱ्हाड पंचायत समिती ही नावलौकिक प्राप्त असलेली पंचायत समिती आहे. मात्र, सध्या पंचायत समितीमधील काही अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचा विसर पडला आहे. त्यामुळे पंचायत समिती आवारात घाणीचे साम्राज्य, इमारतीमध्ये अधिकाऱ्यांच्या खोलीच्या प्रवेशद्वाराजवळच महत्त्वाच्या फायलींचे गठ्ठे पडलेले आहेत. विविध योजनांच्या माहिती पुस्तिका व फायलींचे गठ्ठे जास्त दिवस ठेवल्याने याठिकाणी गठ्ठ्यांवर धूळ बसली आहे.
इमारतींमध्ये तीन मजले असून, यात तळमजल्यावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व कृषी विभागाचे कार्यालय आहे. शालेय पोषण विभाग पहिल्या मजल्यावर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांच्या सह ग्रामपंचायत व अर्थ आणि सहायक गटविकास अधिकारी विभागाचे कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग व यशवंतराव चव्हाण सभागृह आहे.
पशुसंवर्धन विभागाखाली असलेल्या स्टोअर रूमच्या खोलीत जुने लिखित स्वरूपातील योजनांच्या फायली, लाथार्थ्यांचे व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माहितींचे महत्त्वाचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. या खोलीत अनेक वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या फायलींची अवस्था दयनीय झाली आहे. फायलींच्या गठ्ठ्यांवर धूळ बसल्याने त्याची अवस्था काय झाली आहे. याची पाहणीसुद्धा अधिकाऱ्यांकडून केली जात असेल का ? हा संशोधनाचा विषय बनला आहे.
वर्षानुवर्षांपासून असलेल्या योजनांच्या माहितीचे फलक हे रंगरंगोटीसाठी काढून ठेवल्याने ते पुन्हा लावण्याचे कामही अधिकाऱ्यांकडून अद्याप केले गेलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना योजना कोणत्या आहेत, हे समजत नाही. माहिती विचारायला गेल्यास योग्य प्रतिसाद मिळत
नाही.

Web Title: The land of the Karhad Committee is 'scarcity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.