माती नालाबांध मुजवून जमिनीचे सपाटीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:20+5:302021-07-27T04:40:20+5:30

आदर्की : फलटण तालुक्याची दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी शेकडो पाझर तलाव, माती नालाबांध बांधले, पाणी अडवण्याचा प्रयत्न केला; पंरतु ...

Land leveling by earthen embankment! | माती नालाबांध मुजवून जमिनीचे सपाटीकरण!

माती नालाबांध मुजवून जमिनीचे सपाटीकरण!

googlenewsNext

आदर्की : फलटण तालुक्याची दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी शेकडो पाझर तलाव, माती नालाबांध बांधले, पाणी अडवण्याचा प्रयत्न केला; पंरतु धोम-बलकवडीचे कालव्याद्वारे पाणी तालुक्यात आल्याने छोटे पाझर तलाव, माती नालाबांध मशीनद्वारे मुजवून लँडमाफियांनी जमिनीचे सपाटीकरण करण्याचा सपाटा लावल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाऊन नैसर्गिक पाणी नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यातील ८४ गावे दुष्काळी होती त्यावेळी उन्हाळ्यात व दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली की, ग्रामस्थ जनावरांसह स्थलांतर करत होते. यावर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शासनाने रोजगार हमी योजना अंमलात आणून दुष्काळात मजुरांना काम व धान्य मिळत होते. त्याच्या मोबदल्यात पाझर तलाव, माती बांध, लघु सिंचन तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, बंधारे आले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जागेवरच मुरल्याने भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली, तर बागायती क्षेत्र वाढल्याने सालपे, आदर्की, बिबी, ताथवडा, उपळवे, विंचुर्णी, मिरढे, दुधेबावी, जावळी, आंदरुड आदी गावांत फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.

लॉकडाऊनचा फायदा घेऊन पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे माती नालाबांधाची आयती माती काढून जमीन सपाटीकरणाची कामे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसाढवळ्या सुरू असल्याने नैसर्गिक पाणी साठे संपुष्टात येत आहे. आगामी काळात धोम-बलकवडीचे पाणी पोटपाटाद्वारे ओढे, नाल्यांना सोडतेवेळी पाणी साठा न होता वाहून जाणार असल्याने पाणीटंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महसूल, कृषी विभागाकडून पाहणी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

(चौकट)

अनेक टेकड्या सपाट.. नाले मुजविले...

धोम-बलकवडी कालव्याचे सर्वेक्षण सुरू होताच लँडमाफियांनी हजारो एकर जमिनी कवडीमोल दराने खरेदी केल्या व तालुक्यात कालव्याद्वारे पाणी येताना लँडमाफियांनी गावातील गावनेत्यांना बरोबर घेऊन शहरातून सूत्रे हलवून टेकड्या सपाट केल्या. नैसर्गिक छोटे नाले मुजवले.

२६आदर्की

फोटो : फलटण पश्चिम भागात कृषी विभागाने बांधलेले माती नालाबांध फोडून जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत आहे.

Web Title: Land leveling by earthen embankment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.