पसरणी घाटात दरड कोसळली, दोन तासानंतर वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 04:09 PM2021-12-02T16:09:37+5:302021-12-02T16:11:02+5:30
वाई-पाचगणी घाटात पहाटेच्या सुमारास दरडी कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वाई : गेल्या दोन दिवसापासून जोरदार अवकाळी पाऊस सुरु असल्याने वाई - पाचगणी घाटात बुवा साहेबाच्या वर मुख्य रस्त्यावर आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरडी कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरड बाजूला करुन वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.
बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या टीमने दोन तासाच्या अथक प्रयत्नातून रस्ता मोकळा करीत वाहतूक सुरळीत केली. दरड कोसळल्याच्या या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशिन व कर्मचाऱ्यामुळे दरड हटविण्यास यश आले.
सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तूरळक होती. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरडी कोसळण्याची भीती व पडणारा प्रचंड पाऊस यामुळे दरड हटविण्यात अडचणी येत होत्या. तरीही मोठ्या प्रयत्नांनी कोसळलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. शक्यतो घाटातून सावकाश प्रवास करून वाहतुकीचे नियम पाळावेत असे, आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.