जास्तीच्या मोबादल्याशिवाय जमीन देणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:33+5:302021-02-16T04:40:33+5:30
निवेदनात म्हटले आहे की, बाबरमाची, हजारमाची येथे पुणे-मिरज रेल्वे रूळ दुहेरीकरणाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य शासनाने ...
निवेदनात म्हटले आहे की, बाबरमाची, हजारमाची येथे पुणे-मिरज रेल्वे रूळ दुहेरीकरणाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य शासनाने जमिनीच्या मूल्यांकनासाठी २०२०-२१ साठी नवीन वार्षिक मूल्यदर तक्ता तयार केला आहे. नवीन मूल्यदर तक्त्यामध्ये एकाच गट नंबरसाठी वेगवेगळे दर आकारले गेले आहेत. शेतकऱ्याच्या संपादित जमिनीला जास्तीत जास्त दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी असताना जिल्ह्यास्तरीय मोबदला निश्चिती समिती मात्र शेतकऱ्यांना कमीत कमी दर देत आहे. शासनाच्या गत मूल्यांकनामध्ये शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिला गेला आहे. आता मात्र शेतकऱ्यांचे काही गट वेगवेगळ्या विभागात दाखवून कमी मोबदला देण्याचा प्रयत्न सरकार, महसूल आणि नगररचना प्रशासन करीत आहे.
शेतकऱ्यांनी तुकडेबंदी व्यवहार केला की त्याचा दंड भरताना जमिनीचे जास्तीचे मूल्यांकन केले जात आहे आणि शेतकऱ्यांना मोबदला देताना कमी दराचे मूल्यांकन केले जात आहे. सरकारला पैसे भरताना जास्तीचा दर व सरकारने शेतकऱ्यांना पैसे देताना कमी दर असा भोंगळ कारभार कऱ्हाडचे निबंधक कार्यालय व नगररचना विभागाकडून होत आहे.
बाबरमाची येथील गट नंबर ८१ साठी १ हजार १०० रुपये चौरस मीटर दर होता. तो २०२१ च्या तक्त्यामध्ये २०० रुपये चौरस मीटर, १ हजार १०० रुपये चौरस मीटर व हेक्टरी ११ लाख ९ हजार ५०० रुपये आहे. नवीन तक्यामध्ये जादाचा दर असताना संबंधित गट नंबरसाठी कमी दराचे मूल्यांकन करण्यात आले आहे. जमिनीचा भाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन मात्र तो दर कागदोपत्री कमी करण्याचा व शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे.