कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बोगस खातेदारांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:39+5:302021-05-20T04:42:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांना जमिनी वाटपाबाबत घेतलेल्या हरकती जिल्हा पुनर्वसन ऑफिसला जमा केलेल्या आहेत, त्यावर ...

Lands of Koyna project victims to bogus account holders! | कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बोगस खातेदारांना !

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बोगस खातेदारांना !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांना जमिनी वाटपाबाबत घेतलेल्या हरकती जिल्हा पुनर्वसन ऑफिसला जमा केलेल्या आहेत, त्यावर कार्यवाही करून परिपूर्ण काम न केल्याने बोगस खातेदारांना वाटप केलेल्या जमिनीची माहिती समोर येत आहे, त्यात अधिकारी आणि एजंट यांचे साटेलोटे असल्यामुळेच विलंब लागत आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जे पात्र खातेदार आहेत, त्यांचे जमीन वाटप तत्काळ सुरू करावे.

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोयना धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांच्या संघर्षातून तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत सातारा जिल्हा प्रशासन संथगतीने काम करत आहे. धरणग्रस्तांच्या संकलनाचे काम चावडी वाचनानंतर पूर्ण होऊन त्यावर जिल्हा प्रशासनाने हरकती घेऊन देखील काम अंतिम झालेले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातून त्रुटी विरहित संकलन १०० टक्के करण्याकरता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, पण सोलापूर आणि रायगडमध्ये जे प्रस्ताव पूर्वी गेले आहेत, त्यावर मात्र कारवाई होणार का? सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना सातारा जिल्हा प्रशासनाने कोणत्या धरणाचे संकलन त्रुटी विरहित केले आहे, ते जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे मग महू, नीरा- देवधर वगैरे धरणांचे संकलन त्रुटी विरहित केले आहे, असे समजून बोगस खातेदारांना जमीन वाटप कसे काय केले आहे? त्यात तुमचा हिस्सा किती आहे, हे पुनर्वसन विभागाने जाहीर करावे.

कोयनेच्या पात्रता लक्षात न घेता बोगस यादी वाटपासाठी वरिष्ठ मंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे, त्यातील खरे किती आणि बोगस किती याची माहिती धरणग्रस्तांच्यासमोर आली पाहिजे. बोगस वाटप कशा पद्धतीने व कोठे बैठक कोण कोणा कोणाबरोबर होतात, त्याची जनतेला पुरेपूर माहिती आहे, त्यामुळेच कोयनेच्या खऱ्या -खुऱ्या प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी कोरोनाचे कारण सांगून विलंब लावत आहे. हा विलंब नक्की कशासाठी असे जनता विचारू लागली आहे. त्यामुळे हा विलंब हा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी केला जात आहे, का असा सवाल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी धरणग्रस्तांनी केला आहे.

कोट

ज्या धरणग्रस्तांनी बोगस पद्धतीने जमिनी घेतल्या आहेत, त्याबाबत तक्रारी सुद्धा केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता त्या फाईल ऑफिसला बाजूला ठेवून त्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे.

- प्रकाश साळुंखे

श्रमिक मुक्ती दल

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कोयना परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या अंगणात बसूनच अशा प्रकारे आंदोलन केले.

Web Title: Lands of Koyna project victims to bogus account holders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.