Satara: डोंगरावर राहतो आम्ही; पर्वा कशाची!, नैसर्गिक संकटांकडे रहिवाशांचे दुर्लक्ष
By सचिन काकडे | Published: July 14, 2023 12:50 PM2023-07-14T12:50:53+5:302023-07-14T12:51:11+5:30
‘माळीण’च्या घटनेतून बोध घेऊन पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी स्थलांतर करणे गरजेचे
सचिन काकडे
सातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्ह्यासह सातारा शहरात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने कानावर येऊ लागल्या आहेत. असे असताना अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांना मात्र याचे कसलेच गांभीर्य नाही. कितीही पाऊस पडूदे, दरड कोसळू दे, जमीन खचू दे, पण आम्ही इथून हलणार नाही, अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.
अलीकडे जमिनींना इतका भाव आला आहे की, सर्वसामान्य नागरिक स्वत:चं घर बांधण्याचं स्वप्नदेखील पाहूच शकत नाही. सातारा शहरातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ साताऱ्यात येणारी अनेक कष्टकरी कुटुंबं जिथे जागा मिळेल तिथे पत्र्याचं शेड उभं करून निवाऱ्याची व्यवस्था करतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत अजिंक्यतारा किल्ला, बोगदा व पॉवर हाऊस परिसरात अशा झोपड्या व घरांची रांग वाढू लागली असून, या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा ठरतो.
पालिकेकडून अशा मिळकतदारांना धोक्याची कल्पना दिली जाते. पावसाळ्यात इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचनाही दिल्या जातात. मात्र, संबंधितांकडून या नैसर्गिक संकटाकडे दुर्लक्ष केले जाते. ‘आजवर काही झालं नाही, मग पुढे तरी काय होणार आहे?’ अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.
याचा धोका अधिक
- अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड असून, ते पडण्याच्या मार्गावर आहे. मुसळधार पाऊस झाल्यास दगडांखालील मातीचे वहन होऊन हे दगड सैल होऊन खाली कोसळू शकतात.
- वृक्षांची मुळे माती घट्ट धरून ठेवण्याचं काम करतात. मात्र, किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे मातीदेखील हळूहळू सैल होऊ लागली आहे.
ही काही उदाहरणे !
- सात वर्षांपूर्वी अजिंक्यतारा किल्ल्यावरील एका घरावर महाकाय दगड येऊन आदळला होता. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले.
- कोकण वसाहतीत असलेल्या एका घराचा पाया मोठ्या प्रमाणात खचला होता. हे घर पडता-पडता वाचले.
- चार भिंती मार्गावरील गृहनिर्माण सोसायटीजवळ चार वर्षांपूर्वी दरड कोसळून घरांनी हानी झाली होती.
ही काळजी घ्याच !
- ‘माळीण’ची घटना आठवली तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात. या घटनेतून बोध घेऊन डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना किमान पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी नातेवाइकांकडे अथवा पर्यायी ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादे नैसर्गिक संकट ओढावल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.