चोपडेवाडीला भूस्खलनाचा धोका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:04+5:302021-08-01T04:36:04+5:30
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील डावरीनजीक डोंगर उताराच्या मध्यभागी असलेल्या वसाहतीजवळ डोंगराचा उताराकडील भागाचे भूस्खलन होऊन मोठा भाग खचल्याने ...
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील डावरीनजीक डोंगर उताराच्या मध्यभागी असलेल्या वसाहतीजवळ डोंगराचा उताराकडील भागाचे भूस्खलन होऊन मोठा भाग खचल्याने येथील ग्रामस्थ दहशतीखाली आली आहे. ग्रामस्थांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. हा निर्माण झालेला भूस्खलनाच्या धोका चोपडेवाडीसाठी धोकादायक असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या भूस्खलनाची पाहणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने पाटण तालुक्यात अनेक गावांमध्ये पुराने घरांचे नुकसान होऊन मोठा धोका निर्माण झालेला आहे. आंबेगावसारख्या काही ठिकाणी जीवितहानी झाली. पण तालुक्यातील अजून अनेक गावे दरडी कोसळण्याच्या धोक्याखाली आहेत.
ढेबेवाडी विभागातील जितकरवाडी, धनावडेवाडी येथे डोंगराच्या दरडी कोसळून मोठा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले त्याचबरोबर सातर, धजगाव-धडामवाडी, चोपडेवाडी, कोळेकरवाडी अशा डोंगरकपारीत अनेक गावांमध्ये डोंगर खचून दरडी कोसळून मोठा धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने तिथले लोक दहशतीखाली आहेत.
डावरी येथील चोपडेवाडी वस्तीत डोंगर खचून गंभीर धोका निर्माण झाला आहे. ती वस्ती डोंगर-उताराच्या मध्यभागी वसलेली आहे. वस्तीला लागूनच असलेला उताराचा डोंगर खचला आहे. तो आणखी खचण्याची शक्यता आहे. आणखी काही भागाचे भूस्खलन झाल्यास संपूर्ण वाडीला धोका होऊ शकतो. त्यामुळे तिथले नागरिक प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करीत आहेत.
(कोट)चोपडेवाडी येथे भूस्खलनामुळे संपूर्ण वस्तीला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले बाळे घेऊन आम्ही रात्री जागून काढीत आहोत. आमच्या मृत्यूचे तांडव पाहण्याच्या प्रसंग ओढवू नये ही प्रशासनाकडून अपेक्षा आहे.
-अंकुश तांबवेकर, ग्रामस्थ चोपडेवाडी (डावरी )
फोटो ओळीः ३१ढेबेवाडी
चोपडेवाडी (डावरी)येथील वसाहतीला लागूनच असलेल्या घरापासून काही अंतरावर उताराकडील बाजूला डोंगर खचला आहे.
(छाया : रवींद्र माने)