घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:34 AM2022-07-20T11:34:27+5:302022-07-20T11:34:45+5:30
कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते.
पेट्री : शहराच्या पश्चिमेस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. या मार्गावरून जाताना पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दरड कोसळून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी रात्री घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्त्यावर आली होती. दरम्यान, काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. मंगळवारी सकाळी बांधकाम विभागाकडून दरड हटविण्यात आली.
पश्चिमेस पावसाचा जोर कायम असून, यवतेश्वर घाटात काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळून काही दगडे, मुरूम, माती रस्त्यालगत पडत आहे. यामुळे वाहनचालकांनी गाडी चालवताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
जागतिक वारसास्थळ कास पठारावर पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने एकीव, दुंद, भांबवली धबधबे दर्शन देऊ लागल्याने तसेच दाट धुक्यात हरवलेला कास तलाव येथील हिरवागार परिसर पाहण्यासाठी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते.
वाहने चालविताना काळजी घ्या
गेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे यवतेश्वर घाटात छोट्या-मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने वाहनचालकांनी वाहने चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. घाटात वेडीवाकडी वळणे असून, रस्त्यातील वळणावरच पडलेल्या दरडीचा अंदाज यावा यासाठी वाहनचालकांनी आपली वाहने कमी वेगाने चालविणे आवश्यक आहे. वाहने घाटात थांबवून फोटोसेशन करणे धोकादायक ठरू शकते. आकस्मिक दरड कोसळली तर विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराच्या पश्चिमेस कास, बामणोलीला पर्यटनाला जाण्यासाठी शाळा, महाविद्यालयीन तरुणाईचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असून, रस्त्यावर पडलेल्या दरडीचा अंदाज न येता मोठ्या वेगाने वाहने चालवित स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. यामुळे असे कृत्य जीवावर बेतू शकते. - कृतज्ञ साळुंके, वाहनचालक, सातारा