केळकर घाटात दरड कोसळली; सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद
By जगदीश कोष्टी | Updated: September 30, 2022 18:11 IST2022-09-30T18:08:32+5:302022-09-30T18:11:08+5:30
परतीच्या पावसाचा धुमाकूळ

केळकर घाटात दरड कोसळली; सातारा-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद
सातारा : सातारा-महाबळेश्वर घाट रस्त्यावर मोठी दरड कोसळून सातारा-महाबळेश्वर रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. यातच जिल्ह्यात महाबळेश्वर-सातारा घाट रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असतानाच, केळघर घाटात शुक्रवारी सकाळी दरड कोसळून हा घाट रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अद्यापही बांधकाम विभागाने ही दरड हटविण्यास सुरुवात केली नव्हती.
या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात हा रस्ता किमान चार महिन्यांत दहा ते बारा वेळा बंद होतो. दरडी कोसळल्याने वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असणारा हा केरघळ घाट वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल, असा सवालही वाहन चालकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. यातच सकाळी भली मोठी दरड आणि दगडांचा ढीग रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद झाला आहे.