Satara: घावरी रस्त्यावर दरड कोसळली, मोरेवाडीतील २३ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले
By दीपक देशमुख | Published: July 22, 2023 03:48 PM2023-07-22T15:48:35+5:302023-07-22T15:49:46+5:30
जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा : जिल्ह्यात हवामान खात्याने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पश्चिम भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी - एरणे रस्त्यावर दरड कोसळली. धोम-बलकवडी धरणाात पाण्याची आवक वाढली असून वाढली असल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरेवाडी, ता. सातारा येथील आणखी २३ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेला मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी ते एरणे रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरड कोसळली. याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हटवून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला. धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी कृष्णा नदी पात्रात मध्ये सोडण्यात येणार आहे. बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यवतेश्वर घाटातील धोकदायक सुमारे २० मीटर लांबीची दरड साेमवारी काढण्यात येणार असून या कालावधीत रस्ता बंद तर ठिकाणापासून कमीतकमी सुमारे तीनशे मीटर परिसरात मनुष्य व जनावरांना नेण्यास मनाई केली आहे.
महाबळेश्वरला ५१.९ तर पाटण तालुक्यात ३४ मि.मी. पावसाची नाेंद
जिल्ह्याच्या पश्चिमेला धूवाँधार बरसणाऱ्या पावसाने पुर्वेला ओढ दिली आहे. सातारा तालुक्यात ५.७, जावली ८.८, पाटण ३४, कराड ११, कोरेगाव २.२, खटाव – १.३, माण १.२, फलटण ०.८, खंडाळा २.१, वाई ६.८, महाबळेश्वर ५१.९ असा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील धरणात ४४ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवक सुरू असल्याने धरणातील ४४.२७ पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात सध्या ४३.१४ टीएमसी, धाेम धरणात ४.२१ टीएमसी, धाेम ३.२१, कण्हेर ३.४९, उरमोडी ४.१० आणि तारळी धरणात ४.१७ टीएमसी इतका साठा झाला आहे.