जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:05+5:302021-05-14T04:39:05+5:30
कऱ्हाड/उंब्रज : पाटण तालुक्यातील तारळे येथील व्यापाऱ्याकडून जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यासह त्याला ...
कऱ्हाड/उंब्रज : पाटण तालुक्यातील तारळे येथील व्यापाऱ्याकडून जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यासह त्याला स्फोटक पुरविणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातारच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.
गोविंदसिंग बाळूसिंग रजपूत-यादव (रा. तारळे) व रतनलाल बाळोजी जाट (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्यासह पथक बुधवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी पाटण तालुक्यातील तारळे येथे एका व्यापाऱ्याने स्फोटकाचा साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने सायंकाळी गोविंदसिंग रजपूत या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शौचालयात चार खोकी आढळून आली. दहशतवाद विरोधी पथकाने खोकी तपासली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. तसेच घरासमोर उभ्या असणाऱ्या जीपमध्येही जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. खोक्यात आढळलेल्या ९ हजार ४५३ रुपयांच्या ८३६ जिलेटीनच्या कांड्यांसह ३ लाख रुपये किमतीची जीप पथकाने जप्त करून आरोपी गोविंदसिंग रजपूत याला अटक केली.
दरम्यान, रजपूतला वाटेगाव येथील रतनलाल जाट हा जिलेटीन पुरवित असल्याची माहिती उंब्रजचे सहाय्यक निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली. त्यानुसार उंब्रजच्या पोलीस पथकाने बुधवारी रात्री उशिरा वाटेगावमध्ये छापा टाकून रतनलाल जाट याला ताब्यात घेत अटक केली. याबाबत दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर भोसले यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.
- चौकट
दोन दिवसांची कोठडी
स्फोटकांचा साठा करून ठेवल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना उंब्रज पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. आरोपींकडे विविध मुद्यांवर तपास करावा लागणार असल्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फोटो : १४केआरडी०४, ०५
कॅप्शन : तारळे, ता. पाटण येथे छापा टाकून दहशतवाद विरोधी पथकाने जिलेटीन स्फोटकाचा मोठा साठा व गुन्ह्यात वापरलेली जीप जप्त केली.