राज्यातील सर्वात मोठा मराठा मोर्चा राजधानीत !
By admin | Published: September 6, 2016 10:34 PM2016-09-06T22:34:09+5:302016-09-06T23:45:15+5:30
जिल्हाभर नियोजन बैठकांचे आयोजन : ‘घरटी एक’ समाजबांधवाला सहभागी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी
सातारा : महाराष्ट्रात सर्वत्र निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात नेत्यांविना समाज बांधव एकत्र येत आहेत. मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातही राज्यातील सर्वात मोठा असा लाखो समाजबांधवांचा मोर्चा काढण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू झाले आहे. ‘ न भुतो न भविष्यति’ असा हा मराठा क्रांती मोर्चा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यासाठी आत्तापासूनच संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या छत्रपती घराण्याच्या वंशजांनीही मोर्चात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय केला आहे. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांनी जाहीर पत्रक काढले असून, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनाही त्यांनी आवाहन केले आहे. राज्यभर मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी साताऱ्याच्या छत्रपती घराण्याने पुढाकार घेतला असल्याने आगामी मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्यामध्ये भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी तालुकावार बैठका घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यामध्ये मराठा समाज बहुसंख्येने आहे. इतिहासाची पाने चाळली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा समाजाने परकीयांविरोधात निकराचा लढा दिला आहे. सर्व जाती-जमातींना सोबत घेऊन या मराठ्यांनी परकीयांची असंख्य आक्रमणे परतावून लावलेली आहेत. अन्यायाविरुद्ध लढताना समाजाला जगण्याचे बळ मराठ्यांनी दिले.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फलटण येथे बुधवारी (दि. ७) मोर्चाच्या नियोजनाची बैठक घेण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी साताऱ्यात नियोजनाची बैठक घेण्यात येईल, अशाच पद्धतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका घेण्यात येतील.
साताऱ्याच्या रणरागिणींनो, तुम्हीही व्हा सहभागी..
वेदांतिकाराजे भोसले : एकवेळ स्वयंपाक आला नाही तरी चालेल, पण स्वरक्षण करता आले पाहिजे
सातारा : ‘युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल, निजाम यांच्या रयतेवरील अत्याचाराच्या विरोधात शस्त्र उचलण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी प्रेरीत केले. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभ्या राहिल्यानेच स्वराज्य निर्मिती झाली, हाच आदर्श पुढे ठेवून साताऱ्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती कर्तव्य सोशल गु्रपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्तृत्ववान महिलेचा वारसा जपण्यासाठी आजच्या स्त्रीने, युवतीने स्वत: सक्षम होणे आवश्यक आहे. एकवेळ स्वयंपाक आला नाही तरी चालेल पण, तिला स्वत:च्या पायावर उभे राहता आले पाहिजे. अन्याय, अत्याचारा-विरोधात लढण्यासाठी स्वरक्षण करता आले पाहिजे. त्यासाठीच मराठा क्रांती मोर्चा सर्वत्र निघत असून, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व महिला भगिनी आणि युवतींनी साताऱ्यात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले आहे.
औरंगाबाद, बीड, परभणी आदी शहरांमध्ये अन्याय, अत्याचाराच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चे जबरदस्त झाले. लाखोंच्या संख्येने मराठा माणूस या मोर्चांमध्ये सहभागी झाला. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकवटलेला हा मराठा समाज मोर्चाच्या माध्यमातून एकसंध होत असून, स्वत:वर होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागत आहे. महिलांवरील अत्याचार या नित्याच्याच घटना झाल्या आहेत.
वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे, शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महिलेवर अत्याचार करणाराचे हात-पाय कलम केले जात होते तर आम जनतेची लूट करणारे, जनतेवर अन्याय करणाऱ्यांना जबर शासन केले जात होते. महिलांवरील आणि जनतेवरील अन्याय सहन न झाल्यानेच राजमाता जिजाऊंनी शिवछत्रपतींना तलवार चालवण्याचे धडे दिले होते.
इतिहास काळात मराठा वीर रणांगणावर असताना स्त्री कुटुंबाचा आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आपले कर्तव्य पार पाडत होती. आज ती परिस्थिती राहिली नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटना निंंदनीय तर आहेतच पण, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहण्यापेक्षा त्याविरोधात एकसंधपणे आवाज उठवण्याची, लढण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळेच स्वयंपाक करता आला नाही, तरी चालेल पण, स्वत:च्या पायावर उभे राहण्याची आणि स्वसंरक्षण करण्याची धमक महिलांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लढा उभा राहिला आहे. संपूर्ण मराठा समाज अन्यायाविरोधात पेटून उठत आहे. हा लढा तीव्र करण्यासाठी महिलांनीही पुढे आले पाहिजे.
मराठा क्रांती मोर्चात आपण स्वत: सहभागी होणार असून, आपल्या समाजाच्या आणि महिला भगिनींच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी सर्व महिला आणि युवतींनी या लढ्यात हिरीरीने सहभागी झाले पाहिजे.
मोर्चाचा उद्देश राजकीय नाही..
मराठा क्रांती मोर्चा हा मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काढण्यात आला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय उद्देशाने प्रेरित नाही. तसेच कोणत्या जाती-जमातीच्या विरोधातही नाही. राज्यभर स्वयंस्फूर्तीने मराठा समाज या मोर्चात सहभागी होत आहे. या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तमाम महिला आणि युवतींनी साताऱ्यात होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.