ल्हासुर्णे गटात मातब्बरांचा संघर्ष अटळ !
By admin | Published: December 21, 2016 11:54 PM2016-12-21T23:54:53+5:302016-12-21T23:54:53+5:30
सर्वच प्रबळ दावेदार : नवीन गट आणि गणांची रचना कोणाच्या पथ्यावर पडणार याविषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता
साहिल शहा ल्ल कोरेगाव
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ल्हासुर्णे जिल्हा परिषद गटात लक्षवेधी लढत होणार असून, काँग्रेससह राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गाठीभेटींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन ही निवडणुकीपूर्वीची रणनीती मानली जात आहे. नव्याने झालेली गट आणि गणांची रचना नेमकी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे व नुकताच राजीनामा दिलेल्या त्यांच्या पत्नी अर्चना बर्गे यांनी दोन टर्म या गटाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांचे वडील दिवंगत संभाजीराव बर्गे यांनी देखील या गटाचे नेतृत्व केले होते. नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर किरण बर्गे यांनी शहरातील राजकारणामध्ये रस न दाखविता, जिल्हा परिषद निवडणूक लढवायची, असा निर्धार केला होता. त्यादृष्टीने त्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून हिरवा कंदील मिळवला होता, अशी काँग्रेसजनांमध्ये चर्चा आहे. त्यांनी गेल्या वर्षापासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली असून, त्यांना या विभागाचा दांडगा अभ्यास आहे. एकाच घरातील तीन व्यक्तींनी या गटाचे प्रतिनिधीत्व केल्याने, त्यांना ही निवडणूक अत्यंत सोपी जाणार आहे. त्यांचे युवक वर्गात असलेले संघटन, ही त्यांची जमेची बाजू आहे.
काँग्रेसमधून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे व जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण हे देखील इच्छुक मानले जात आहेत. नवनाथ केंजळे हे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत, त्याचबरोबर त्यांचा या विभागात दांडगा लोकसंपर्क आहे. ग्रामीण भागात त्यांचे संबंध व किसन वीर परिवाराचे अध्यक्ष मदन भोसले यांच्याशी असलेले स्रेहबंध ही सर्वाधिक जमेची बाजू मानली जात आहे. अॅड. श्रीकांत चव्हाण हे काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या मातोश्रींनी यापूर्वी एकंबे जिल्हा परिषद गटाचे पाच वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा एकंबे गणात विशेष संपर्क आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील युवा पिढीशी असलेले त्यांचे नाते, ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
ल्हासुर्णेवासीय झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी या गटाकडे आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. नितीन भोसले हे या गटात प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या गटात बांधणी केली आहे. विविध कार्यक्रमांना असलेली त्यांची उपस्थिती हे त्याचे घोतक मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्वीच्या एकंबे जिल्हा परिषद गटाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांनी तेथे मताधिक्य मिळवून दिल्याने, त्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्याबरोबरच साताऱ्याचे उपनगराध्यक्षपद भूषविलेले व एकसळ गावचे सुपुत्र जयवंत भोसले हे देखील इच्छुक आहेत, त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सतत या गटात संपर्क ठेवला आहे. त्यांचे कोरेगावात तालुक्यातील दौरे हे त्याचे लक्षण मानले जात आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्याबरोबरच या गटात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हे देखील इच्छुक आहेत, त्यांनी उमेदवारीची मागणी आमदार शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेने देखील या गटात दावेदारी केली आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख व एकसळ गावचे सुपुत्र रणजितसिंह भोसले हे प्रबळ दावेदार असून, त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहता, त्यांना ही निवडणूक सोपी आहे. त्यांचे वडील नानासाहेब भोसले यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भूषविले असून, त्यांची या गटात मजबूत बांधणी व संपर्क आहे. रणजितसिंह भोसले यांनी आपल्या बंधूंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकसळ येथे कार्यक्रम घेतला व त्यासाठी सेलिब्रिटी आणल्याने तो चर्चेचा विषय आहे. या कार्यक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, त्यांची दावेदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्याबरोबरच भाजप देखील या गटात उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससह अन्य पक्षात होणारी बंडखोरी ही भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याने त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवलेली आहे.