...अखेर पस्तीस वर्षांच्या परिश्रमाला फळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:45 AM2017-09-07T00:45:27+5:302017-09-07T00:45:31+5:30
अजय जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : कुस्तीत ‘धोबीपछाड’ हा डाव करणारे पैलवान प्रल्हाद जाधव तत्कालीन आर्थिक परिस्थिती व वस्ताद नसल्यामुळे कुस्तीक्षेत्रात देशपातळीवर चमकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. पण, गेली ३५ वर्षे त्यांनी कुस्तीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच ट्रेडिशनल रेसलिंग या कुस्तीच्याच प्रकारात भारताच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून ते निवडले गेले आहेत. ३५ वर्षांच्या अथक परिश्रमातील ‘धोबीपछाड’ने ते जिंकले आहेत.
कोणताही खेळ असो अथवा जीवनसंघर्ष यात जय, पराजय हा होत असतो. जो पराजयाने खचत नाही. यश मिळविण्यासाठी मेहनत करतो आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करतो. तो खेळात व जीवनात यशस्वी होतो, असाच पैलवान प्रल्हाद जाधव यांचा संघर्षमय यशस्वी जीवनप्रवास आहे. जाधव यांनी लाल मातीतील कुस्तीची सुरुवात वयाच्या सातव्या वर्षी सुरू केली. तालमीतील व्यायाम व कुस्तीतील डाव उंब्रजच्याच तालमीत शिकले. पण, वस्ताद मिळाले नाहीत. त्यामुळे सहकाºयांच्या मदतीने शिकलेल्या डावावर हा पैलवान कुस्तीचे फड जिंकू लागला. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुरेसा खुराक मिळणेही अवघड झाले आणि हा पैलवान युक्ती आणि शक्ती असूनही पाठीमागे पडू लागला. स्वप्न तर देशाचे प्रतिनिधित्व करायचे पाहिले होते. पण, आर्थिक परिस्थिती व वस्ताद मिळाला नसल्यामुळे त्यांचा स्वप्नभंग झाला. तरीही हा पैलवान गडी खचला नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीबरोबर किराणा मालाचे दुकान चालवू लागले. याच व्यवसायातून पुढे त्यांनी प्रगती करीत स्वत:चा फर्निचर तयार करण्याचा कारखाना सुरू केला. हे सर्व करीत असताना कुस्तीकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. स्वत:ला जमले नाहीतर गावातील, भागातील कोणीतरी आपले स्वप्न पुरे करेल. या आशेने स्वत:च्या व ग्रामस्थांच्यासहकार्यातून वडील दिवंगत रामचंद्र बाबूराव जाधव यांच्या स्मरणार्थ कुस्तीचे फड उंब्रजमध्ये भरवू लागले. हे कुस्ती मैदान गेली आठ वर्षे ते भरवीत आहेत.
या मैदानाच्या माध्यमातून त्यांचाच पुतण्या, मुलगा आणि मुलगी यांच्या रूपात त्यांनी आपले स्वप्न पाहिले. पुतण्या संग्राम जाधव याने मॅटवरील कुस्तीत इंडो नेपाळमध्ये कांस्यपदक पटकावले. लालमातीवरील कुस्तीत सध्या तो विविध फड गाजवत आहे. मुलगा प्रणव जाधव याने बेल्ट रेसलिंग या प्रकारात देशपातळीवर सलग तीन वर्षे आॅल इंडिया चॅम्पियनशीप मिळविली आहे. तर मुलगी प्रणोती जाधव हिने ही सलग दोन वर्षे देशपातळीवर आॅल इंडिया चॅम्पियनशीप मिळविली आहे. या माध्यमातून पैलवान प्रल्हाद जाधव यांनी आपले स्वप्न पूर्णत्वाकडे नेले आहे.
त्यामुळे तेही बेल्ट रेसलिंग या कुस्तीच्या प्रकाराचा अभ्यास करू लागले. तसेच शिकू आणि शिकवू लागले. त्यांचा पैलवान ते प्रशिक्षक असा प्रवास सुरू झाला. हा खेळ विद्यालयाच्या शालेय क्रीडा प्रकारामध्ये ही समाविष्ट करण्यात आला आहे.
पैलवान प्रल्हाद जाधव यांनी या खेळाकडे लक्ष केंद्रीत केले. कुस्तीत देशपातळीवर जाण्यासाठी अपयश आलेल्या या पैलवानाने या कुस्तीच्या प्रकारात पंच म्हणून तालुका पातळीवर सुरुवात केली आणि पंच म्हणून त्यांनी एक-एक यशाची शिखरे सर करण्यास सुरुवात केली. जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावर्षी ट्रेडिशनल रेसलिंग या कुस्ती प्रकारासाठी त्यांची भारताच्या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
उंब्रज गावचे नाव देशपातळीवर...
मला कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे होते. माझे प्रेरणास्थान हे आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव होते. पण, कुस्तीत घडण्यासाठी वस्ताद लागतो. ते मला मिळाले नाहीत आणि मी आर्थिक बाजूने कमजोर असल्यामुळे कुस्तीत मला मर्यादा आल्या. आमच्या गावात नवीन तालीम बांधण्यात आली. तेव्हा मी विद्यार्थीदशेत होतो. तालमीत येणाºया मुलांनी पन्नास पैसे नवीन तालमीसाठी देणे सक्तीचे होते. जो हे पैसे देणार नाही त्याला आठवडाभर तालमीत प्रवेश देण्यात येणार नव्हता, असे ठरले होते. ते पन्नास पैसे मी भरू शकलो नव्हतो. त्यामुळे मला आठवडाभर तालमीत जाता आले नव्हते. त्याचवेळी मी मनाशी खूणगाठ बांधली की कुस्तीत नाव कमवायचे आणि कुस्तीत पैलवान म्हणूनही भागात नाव मिळवायचे, असे प्रल्हाद जाधव यांनी सांगितले.
दहा हजार बैठका...
ही स्पर्धा तुर्कमेनिस्तान देशाच्या राजधानीत होणार आहे. अशा प्रकारे लालमातीत तयार झालेल्या पैलवान प्रल्हाद जाधव यांचा स्वप्नपूर्तीचा प्रवास पैलवान ते पंच आणि पंच ते भारतीय संघाचा प्रशिक्षक असा पूर्ण झाला आहे. कुस्तीत जाधव यांना १४ पुरस्कार मिळाले आहेत. तर ६ पदके व गदा मिळाल्या आहेत. त्यांनी सलग दहा हजार बैठका व सात हजार जोर काढण्याचे रेकॉर्ड ही केलेले आहे.