देऊरचं ब्रिटीशकालीन विश्रामगृह मोजतंय शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:50 PM2017-07-18T13:50:01+5:302017-07-18T13:50:01+5:30
कोणीही या... खिडक्या अन दरवाज्यांअभावी आले धर्मशाळेचे रुप
आॅनलाईन लोकमत
वाठार स्टेशन (जि. सातारा), दि. १८ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेले देऊर येथील शासकीय विश्रामग्रह सध्या शेवटची घटका मोजत आहे. खिडक्या, दरवाजे तुटल्याने विश्रामगृहाची अवस्था धर्मशाळेसारखी झाली आहे.
नागपूरचे संस्थापक व देऊरचे राजे रघुजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या या विश्रामगृहाची दूरूस्ती व्हावी यासाठी गेली अनेक वषार्पासून देऊर ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. मात्र निधीअभावी दुलक्षीत राहिले आहेत. सातारा-लोणंद राज्य महामार्गावरील देऊर येथील हे ब्रिटीशकालीन विश्रामगृह साधारण २ ते ३ एकर परिसरात बांधले आहे. या विश्रामगृहाच्या संरक्षक भिंती जागोजागी पडलेल्या आहेत. भिंतीना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. दरवाजे, खिडक्या तुटल्याने या विश्रामग्रहात गैरप्रकार सुरू आहेत. यासाठी हे पुरातन विश्रामगृह दुरस्त व्हावे ही देऊर करांची मागणी आहे.
देऊर गाव दत्तक घेतलेल्या आमदारांनीही या विश्रामगृहाच्या दुरूस्तीचे गाजर दाखवण्याचेच काम केल्याने देऊरकरांचा हा प्रश्न कोण सोडवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐतिहासीक महत्व असलेल्या या विश्रामगृहात यापूर्वी मंत्री सदाशीव मंडलीक यांनी या भागातील वसना प्रकल्पासाठी पहिली पाणी परिषद घेतली होती. त्यानंतर विधान सभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शंकराराव जगताप, माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांच्या अनेक टंचाई बैठका याच विश्रामग्रहात झाल्या आहेत.
अत्यंत सुबक नक्षीकाम असलेले हे विश्रामगृह पुन्हा सुव्यवस्थीत व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाच्या दुरस्तीकडे वेळेत लक्ष दिले तरच ही वास्तू जिवंत राहिल. अन्यथा ती कायमची नामशेष होईल अशी भिती देऊरकरांना आहे. जिल्हा नियोजनच्या मंजुरीनंतर दुरुस्ती शक्य तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या शिफारशीनुसार या विश्रामगृहाच्या दुरुस्ती कामाची माहिती जिल्हा नियोजन समितीकडे पाठवली आहे.
जिल्हा नियोजन समितीतून त्यास मंजुरी आल्यानंतर या विश्रामग्रहाची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे, अशी माहिती कोरेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. टी. अहिरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.