कोयनेतील दुर्गम किल्ले मोजताहेत अखेरची घटका!
By admin | Published: August 4, 2015 11:23 PM2015-08-04T23:23:00+5:302015-08-04T23:23:00+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : जागतिक वारसा जपतोय; पण ऐतिहासिक वारसा हरवतोय
धीरज कदम - कोयनानगर -अतिशय दुर्गम, डोंगराळ अशा कोयना परिसरातील पर्यटनस्थळांची परवड अद्यापही थांबलेली नाही. एकेकाळी शिवाजी महाराज व त्यांच्या सवंगड्यांनी काही काळ वास्तव केलेल्या येथील भैरवगड, प्रचितगड, जंगली, जयगड या किल्ल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागतिक वारसा हक्काच्या यादीत कोयना धरणाचा समावेश झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे, पण ऐतिहासीक वारसा हरवतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील जंगली जयगड येथे जाण्यासाठी फक्त चौथ्या टप्प्यापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे फक्त पायवाट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी येथे रस्ता व्हावा, अशी मागणी करुनही येथील वनविभाग प्रत्येक वेळी याकामी आडमुठी भूमिका घेत आहे. पर्यटन विभागानेही या ठिकाणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे इतकी पडझड झाली आहे की, याठिकाणी शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने पावन झालेला किल्ला होता असे जर एखाद्या नवख्या व्यक्तीला सांगितले तर विश्वासच बसणार नाही.हेळवाकच्या दक्षिणेस भैरवनगड नावाचा आणखी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचीही मोठी पडझड झाली आहे. येथे जाण्यासाठी हेळवाकपासून पातारपुंज गावापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे सर्व अंतर पायवाटेने जावे लागते. येथेही रस्ता व्हावा म्हणून येथील काही जमीनमालकांनी आपल्या जमिनी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही येथील वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे येथे रस्ता झालेला नाही. येथील भैरवनाथ मंदिरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते. तेथे सर्व भाविकांना चालत जावे लागते. हा परिसर घनदाट जंगल आणि दऱ्या-खोऱ्यांचा आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही सुविधा नाहीत. येथून जर एखाद्याचा पाय घसरला तर तो किमान दोन हजार फूट खोल दरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.प्रचितगड हा देखील पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक असाच आहे. येथे जाण्यासाठी हेळवाक ते तळोशीपर्यंत तीन किलोमीटर डांबरी रस्ता आहे. तेथून पुढे १५ ते १६ किलोमीटर पायवाटेने चालत जावे लागते. हा किल्ला डोंगर उतरावर असल्याने येथे सातारा जिल्ह्याच्या बाजूने जाताना तिव्र उतार आणि रत्नागिरीकडून येताना चढ चढून यावे लागते. येथे असणारी पायवाटही धोकादायक आहे. येथील सातगाव कमिटीने किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी, म्हणून वेळोवेळी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे निवेदने दिली आहेत. मात्र, अजून एकही मागणी मान्य झालेली नाही. पर्यटन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणाची दुरुस्ती करुन आपला ऐतिहासिक वारसा समृद्ध करावा, अशी मागणी होत आहे.
भैरवगडावर अनेक ऐतिहासीक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची पडझड झाल्याने अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जबाबदार वनविभागच असून त्याच्या भूमिकेमुळे स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे.
- ईश्वरी जोशी
पर्यटक, चिपळूण