भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप, नायब सुभेदार शंकर उकलीकर यांना मानवंदना देण्यासाठी नागरिकांची गर्दी
By संजय पाटील | Published: October 13, 2023 02:37 PM2023-10-13T14:37:53+5:302023-10-13T14:38:10+5:30
कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत आले वीरमरण
कऱ्हाड/तांबवे : वीर जवान तुझे सलाम, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत भारतमातेचे हुतात्मा सुपुत्र नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) यांना कऱ्हाडकरांनी अखेरचा निरोप दिला. शहीद जवान शंकर उकलीकर यांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांच्या पार्थीवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अबालवृद्धांसह नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. कऱ्हाडपासून वसंतगडपर्यंत सुमारे दहा किलोमीटर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते.
वसंतगड येथील शंकर उकलीकर हे भारतीय सैन्यदलात इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार या पदावर देशसेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कुलमध्ये झाले. कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. २००१ साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी बावीस वर्ष सेवा बजावली.
त्यादरम्यान २००८ साली त्यांनी पुर्ण बर्फाच्छादीत शिखरावर चढण्याचा माऊंटींग कोर्स पुर्ण केला होता. त्यामध्ये त्यांना अ श्रेणी प्राप्त झाली होती. मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपमधील १२२ इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावत होते. मात्र, त्याचठिकाणी झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले.
शुक्रवारी त्यांचे पार्थीव सैन्यदलाच्या वाहनातून कऱ्हाडात आणण्यात आले. कऱ्हाडातील विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव मुळ गावी वसंतगडला नेण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते. दुपारनंतर वसंतगडाच्या पायथ्याशी पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.