पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप...
By Admin | Published: March 22, 2015 10:49 PM2015-03-22T22:49:10+5:302015-03-23T00:45:39+5:30
सरताळे : सूरज मोहिते अमर रहे; हजारो ग्रामस्थांकडून अंत्यदर्शन
कुडाळ/ वाई : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांचे पार्थिव मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आल्यानंतर हजारो ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच यावेळी ‘सूरज मोहिते अमर रहे !, जब तक सूरज-चाँद रहेगा, सूरज मोहिते तुम्हारा नाम रहेगा !,’ अशा घोषणा देत पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर शहीद मोहिते यांचे पार्थिव सिद्धनाईवाडी (वाई)कडे नेण्यात आले. जावळी तालुक्यातील मूळचे गणेशवाडीचे असणारे सूरज सर्जेराव मोहिते हे ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना वीर मरण आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा जावळी तसेच वाई तालुक्यातील ग्रामस्थांना होती. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास शहीद सूरज मोहिते यांचे पार्थिव गणेशवाडी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक जवान मोहिते यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करीत होते. यावेळी ‘सूरज मोहिते अमर रहे !, जब तक सूरज-चाँद रहेगा, सूरज मोहिते तुम्हारा नाम रहेगा !,’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.
यावेळी प्रशासन आणि मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. माजी आमदार मदन भोसले, पंचायत समिती सभापती सुहास गिरी, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार रणजित देसाई, आबानंदगिरी महाराज, सौरभ शिंदे, प्रशांत तरडे, सरताळेचे सरपंच विश्वनाथ गायकवाड, रवी परामणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी शहीद मोहिते यांच्याविषयी मित्रांनी पाणावलेल्या डोळ्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. सैन्य भरतीच्या वेळी सूरज मोहिते हे मित्रांबरोबर गेले होते; पण त्यावेळी ते एकटेच भरती झाले होते.
जिद्द आणि चिकाटीमुळेच ते सैन्यात गेले होते. गरीब परिस्थितीतून खडतर मार्ग पार करीत त्यांनी हे यश मिळविले होते. फेब्रुवारी महिन्यातच ते सुटीवर असताना सरताळे येथे येऊन गेले. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. आमचा मित्र आम्हाला सोडून गेला याचे दु:ख आहे. पण, देशसेवेसाठी सूरजला वीर मरण आले याचा अभिमानही वाटतो, अशा भावना शहीद सूरज मोहिते यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
मित्रांनी फोडला टाहो, ‘आमचा सुपरमॅन गेला...’
गणेशवाडी येथे पार्थिव आल्यानंतर मित्रांच्या भावना अनावर झाल्या. आमचा सुपरमॅन गेला, असे म्हणत त्यांनी अश्रूला मोकळी वाट करून दिली.
गेल्यावर्षी गुढीपाडव्याला गणेशवाडी अन् कापसेवाडी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सूरज मोहिते यांचा सत्कार करण्यात आला होता; परंतु यावर्षी गुढीपाडव्याला ते शहीद झाल्याची बातमी समजली. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.