आडनाव बदललं; पण ‘वाडी’ सुटेना!---गाव बदललं, नाव बदलायचंय

By Admin | Published: February 13, 2015 10:00 PM2015-02-13T22:00:30+5:302015-02-13T22:56:33+5:30

कागदावर ‘भुडकेवाडी’, कमानीवर ‘मोरगाव’ : पस्तीस वर्षांपूर्वी प्रस्ताव; वाट पाहून अखेर ग्रामस्थांनीच केलं नामकरण-

Last name changed; But 'Wadi' suetena! --- The village changed, I want to change the name | आडनाव बदललं; पण ‘वाडी’ सुटेना!---गाव बदललं, नाव बदलायचंय

आडनाव बदललं; पण ‘वाडी’ सुटेना!---गाव बदललं, नाव बदलायचंय

googlenewsNext

संजय पाटील - कऱ्हाड- प्रसिद्ध ठिकाणावरून, ऐतिहासिक संदर्भावरून किंवा देवदेवतांच्या अधिष्ठानावरून बहुतांश गावांची नावे आहेत; पण पाटण तालुक्यातील तारळे विभागात असलेल्या भुडकेवाडीचे नाव चक्क ग्रामस्थांच्या आडनावरून पडल्याचं सांगितलं जातं. मुळात ‘कोंबडी आधी की अंडी’ हा जसा यक्षप्रश्न, तसाच आडनावरून गावाचं नाव की, गावाच्या नावावरून आडनाव, या प्रश्नाचं उत्तर ग्रामस्थांना अद्याप सापडलेलं नाही; पण काहीही असलं तरी त्यांना हे नाव बदलायचंय. त्यासाठी त्यांनी प्रस्तावही दिलाय. मात्र, शासन दरबारी उशीर लागत असल्याने त्यांनी स्वत:च गावाच्या कमानीवर ‘मोरगाव’ असं लिहून टाकलंय.
तारळे विभागात सुमारे अकराशे लोकवस्तीचं भुडकेवाडी गाव असून, वरची भुडकेवाडी व खालची भुडकेवाडी या दोन भागांत हे गाव विखुरलं आहे. येथील बहुतांश ग्रामस्थांचं पूर्वी ‘भुडके’ असं आडनाव होतं. त्यावरूनच गावाला भुडकेवाडी नाव पडलं असावं; पण सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी पाटण पंचायत समितीचे तत्कालीन सभापती आनंदराव मोरे यांनी गावाच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रामसभेत त्याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांनी आडनाव बदलून ‘मोरे’ केले असल्यामुळे गावाला ‘मोरगाव’ हे नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यावेळी झाली. तसा ठरावही झाला. संबंधित ठराव व नाव बदलाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे व पुढे जिल्हा परिषदेकडे दिला. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. गावाला अजूनही भुडकेवाडी म्हणूनच ओळखलं
जातं.
शासकीय काम अन् सहा महिने थांब, अशी प्रचलित म्हण आहे. मात्र, भुडकेवाडीच्या ग्रामस्थांनी तब्बल पस्तीस वर्षे वाट पाहिली. शासन दरबारी काहीच हालचाल होत नसल्याने अखेर गावाच्या स्वागत कमानीवर ‘भुडकेवाडी ऊर्फ मोरगाव’ असं लिहिलं. स्वागत कमानीबरोबरच गावातल्या प्रत्येक पाटीवर भुडकेवाडीऐवजी ‘मोरगाव’ झळकू लागलं. परिसरात याच नावानं गावाला आता ओळखलं जातंय.
वाडी म्हटलं की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे गावाचं नाव सांगताना आम्हाला, विशेषत: मुलांना अपमानास्पद वाटतं, सरपंच दिनकर मोरे सांगत होते.
‘गावानं शासनाच्या प्रत्येक अभियानामध्ये सक्रिय सहभागी होतं यश मिळवलं. आता आम्हाला गावाचं नाव बदलण्याची प्रतीक्षा लागली आहे. शासनाने ग्रामस्थांची अडचण लक्षात घेवून ही मागणी तातडीने पूर्ण करावी,’ अशी सरपंच मोरे यांनी केली आहे.

पुरस्कारप्राप्त भुडकेवाडी
भुडकेवाडी गावाला जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २००८ साली गावाला निर्मल ग्राम, २००९ साली तंटामुक्ती, २०१० ते २०१३ पर्यंत सलग तीनवेळा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व २०१२ मध्ये गावातील जिल्हा परीषद शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

विकासकामे होऊनसुद्धा नावात वाडी असल्याने आमच्या गावाला महत्व मिळत नाही. गाव मोठं असुनही फक्त नावामुळे गावाला वस्ती समजलं जातं. माणसांच्या बघण्याचा दृष्टीकोन आमच्या लक्षात येतो. मात्र, आमचा नाईलाज आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी.
- दिनकर मोरे, सरपंच


भुडकेवाडीला विभागात सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. देशसेवेत या गावाचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या गावात आजी-माजी असे एकूण पस्तीस सैनिक आहेत. कारगिल युद्धात शहीद झालेले गजानन मोरे हे सुद्धा याच गावचे. सध्या गावात शहीद मोरे यांचे भव्य स्मारक आहे.


गावातील मुले-मुली शिक्षणासाठी शहरात जातात. उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्तही अनेकजण शहरात वास्तव्यास आहेत. त्याठिकाणी गावाचे नाव सांगितल्यानंतर काहीजण वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे अपमानास्पद वाटते. गावाचे नाव बदलावे, अशी विद्यार्थ्यांचीही मागणी आहे.
- समाधान मोरे,
ग्रामपंचायत सदस्य

Web Title: Last name changed; But 'Wadi' suetena! --- The village changed, I want to change the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.